चार दिवस बत्ती गुल
By admin | Published: June 27, 2015 11:42 PM2015-06-27T23:42:07+5:302015-06-27T23:42:07+5:30
वाडा तालुक्यातील कुडूस नजीकच्या चांबळे डाकिवली व परिसरातील काही गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून चार दिवस बत्ती गुल झाल्याने
कुडूस : वाडा तालुक्यातील कुडूस नजीकच्या चांबळे डाकिवली व परिसरातील काही गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून चार दिवस बत्ती गुल झाल्याने वीजेअभावी पंप बंद आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
वादळी पावसामुळे जागोजागी खांब पडल्याने चांबळे डाकिवली व अंबाडी परिसरातील अनेक गावांना वीज पुरवठा करणारी लाईन खंडीत झाली. महावितरणकडे आपत्कालीन परिस्थितीत लागणारी यंत्रणा नसल्याने असलेल्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांना सगळीकडे धावावे लागते. यामुळे वीजखांब शोधणे व त्यावरील तुटलेल्या तारा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तीन दिवस लागले. मात्र चांबळे डाकीवलीत चौथ्या दिवशीही वीजपुरवठा झालेला नव्हता.
येथील विद्युत जनित्रातील बिघाड, पडलेले पोल यामुळे या गावातील चार दिवस बत्ती गुल झाली आहे. कपडे व भांडी धुण्यासाठी पावसाचे पाणी साठवून ठेवले. पिण्यासाठी गाव हद्दीबाहेरून पायपीट करून पाणी आणावे लागले. शाळेतील मुलांना पिण्यापुरतेच
पाणी दिल्याचेही संदेश पाटील यांनी सांगितले.
जुनी वीज लाईन, सडलेले पोल, निकृष्ट प्रकारचे काम यामुळे वादळी वाऱ्यात मोठी हानी होते. आणि वीजपुरवठा बंदचा त्रास ग्राहकांना होतो असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. वीजपुरवठा त्वरीत सुरू करावा अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)