चार दिवस अतिपावसाचा इशारा; राज्याला रेड अन् ऑरेंज अलर्ट, पुराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:04 AM2022-08-08T07:04:52+5:302022-08-08T07:05:01+5:30
नदीकाठच्या गावांना अलर्ट
मुंबई : पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोर पकडला असून, आता पुढील चार दिवस हवामान खात्याने राज्यालाही रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याने दिला असून, काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही श्रावणसरी बरसल्या.
पाऊस का पडणार?
- मान्सूनचा आस ॲक्टिव्ह असून, सरासरी जागेपासून दक्षिणेकडे शिफ्ट झाल्यामुळे पुढील ४-५ दिवस याच जागेवर स्थिर राहण्याची शक्यता.
- बंगाल, ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीसमोरील चक्रीय वाऱ्याची स्थिती व त्यातून त्याच ठिकाणी तयार होणाऱ्या अधिक उंचीचे कमी दाब क्षेत्र व त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर. हे क्षेत्र पश्चिम दिशेकडे म्हणजे ओरिसा, झारखंड, छत्तीसगडकडील मध्य प्रदेशपर्यंतच्या भू-भागावर सरकण्याच्या शक्यतेमुळे.
- अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीसमोर तयार होणारे तटीय कमी दाब क्षेत्र.
- दक्षिण गोलार्धातील भारतीय समुद्रात मादागास्कर बेटाजवळील हवेचे दाब क्षेत्र व त्यानिगडित ईशान्येकडे वाहणाऱ्या बळकट वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या दक्षिणेकडील ४-५ राज्यांत पाऊस पडेल, असे हवामान खात्याचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.
वीज पडून महिला ठार, सहा जखमी
तालुक्यातील किन्ही वन शेतशिवारात वीज कोसळून एक महिला ठार, तर सहा जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. गिरजाबाई गंगाधर शेडमाके रा. चिंचोली, असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यात किन्ही वन येथील बळीराम उईके यांच्या शेतात वीज कोसळली. वीज कोसळल्याने गिरजाबाई शेडमाके यांचा जागीच मृत्यू झाला. बळीराम उईके, सविता मेश्राम, सोनू पराते, शारदा उईके, संगीता कुसराम, नीता पेंदोर (सर्व रा. चिंचोली) (कोपरी) हे जखमी झाले.
महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस हवामान बदलाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग