मुंबई : विक्रोळीतील सूर्यनगर परिसरात तीन दुकाने आणि एका हॉटेलला मंगळवारी दुपारी भीषण आग लागून लाखो रुपये किमतीचा माल खाक झाला. हार्डवेअरच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे दोघे जवान किरकोळ जखमी झाले. नाना वेव्हारे व घनश्याम परब अशी त्यांची नावे असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच एक हॉटेल, दोन हार्डवेअरची दुकाने आणि एक शिधावाटप केंद्र असून, या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. पोटमाळ्यावर सामान असल्याने आगीचा भडका वाढला. काही वेळातच ही आग बाजूची दुकाने व हॉटेलमध्ये पसरली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या काही वेळातच या ठिकाणी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र ही आग विझवत असताना नाना वेव्हारे व घनश्याम परब हे जवान किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. (प्रतिनिधी)
विक्रोळीत चार दुकानांना आग
By admin | Published: June 01, 2016 3:14 AM