मजुराच्या शरीरातून काढली चार फुटांची सळई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:10 AM2018-03-15T02:10:45+5:302018-03-15T02:10:45+5:30
नाशिक येथे मजुरीचे काम करणाऱ्या सलीम शेख याच्या पोटात घुसलेली लोखंडी सळी खांद्यातून बाहेर निघाली होती. जे. जे. रुग्णालयात त्याच्यावर तब्बल पाच तास जटिल शस्त्रक्रिया करत सळी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
मुंबई : नाशिक येथे मजुरीचे काम करणाऱ्या सलीम शेख याच्या पोटात घुसलेली लोखंडी सळी खांद्यातून बाहेर निघाली होती. जे. जे. रुग्णालयात त्याच्यावर तब्बल पाच तास जटिल शस्त्रक्रिया करत सळी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
सलीमच्या पोटात १३० सेंटीमीटर लोखंडी सळई घुसून, शरीरात रक्तस्त्राव सुरू झाला होता. सीटी स्कॅननंतर वैद्यकीय अहवाल आल्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. डॉक्टरांच्या दोन चमूने मिळून या शस्त्रक्रियेचे आव्हान पेलले. ही लोखंडी सळई लहान आतडे, यकृत, शरीरातील काही महत्त्वाच्या रक्तवाहिन्या यांच्या आरपार गेली होती. रुग्णाच्या शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना इजा न झाल्याने, त्याचे प्राण वाचल्याचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.
शुक्रवारी नाशिकमध्ये इमारत बांधकामाच्या ठिकाणी सलीमचा तोल गेल्याने, तो नऊ फुटांवरून खाली पडला. सळ्यांच्या ढिगाºयावर पडल्याने, त्याच्या ओटीपोटातून आरपार घुसलेली सळई मानेतून बाहेर निघाली होती. सलीमच्या सहकाºयांनी सळईचा खालचा भाग कापून त्याला निफाडच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. निफाडहून उपचारांकरिता जे.जे.मध्ये हलविण्यात आले.