लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यानंतर पहिले हॉटस्पॉट ठरलेल्या विभागांनी अखेर कोविडविरुद्धचा लढा यशस्वी करून दाखविला आहे. मोठ्या झोपडपट्ट्या असल्यामुळे आव्हान ठरलेले वरळी आणि बोरीवली विभाग आज प्रतिबंधमुक्त झाले आहेत. त्यापाठोपाठ भायखळा आणि वांद्रे पश्चिम या विभागांनीही कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविले आहे.
गेल्या महिनाभरात मुंबईतील कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा ४०० ते ६०० दरम्यानच राहिला आहे. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीदेखील ३६४ दिवस इतका आहे. मात्र वरळी, डोंगरी, बोरीवली आणि भायखळा या विभागांमध्ये कोविडविरुद्धची लढाई सोपी नव्हती. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याचा धोका होता.
अशी तोडली संसर्गाची साखळीमहापालिकेने बाधित रुग्ण आढळून आल्यावर संबंधित झोपडपट्टी प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध व त्यांचे कोरोना केअर सेंटरमध्ये अलगीकरण यावर भर देण्यात आला. यामुळे झोपडपट्टीमध्ये संसर्गाची साखळी तोडण्यात पालिकेला यश आले. सामाजिक कार्यकर्ते आणि बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दररोज किराणा सामानाचा पुरवठा करण्यात आला.
n भायखळा, नागपाडा येथे एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तत्कालीन साहाय्यक आयुक्तांची तत्काळ बदली करण्यात आली होती. ७ जानेवारी २०२१ रोजी या विभागातील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१६ टक्के एवढा आहे.
n बोरीवली विभागात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे २१,४६२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. येथे आता ५८० सक्रिय रुग्ण असून, रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१८ टक्के एवढा आहे.
असे पेलले इमारतींमधील संसर्गाचे आव्हानजुलैनंतर मुंबईतील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे प्रामुख्याने उत्तुंग इमारतींमधील रुग्णांचा आकडा वाढला. मात्र इमारतींमधील रहिवाशांकडून पालिकेला सहकार्य केले जात नसल्याने येथे प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले. त्यामुळे संबंधित इमारतींच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन उपाययोजना आखण्यात आल्या. या मोहिमेला यश मिळाले.