Join us  

चार तासांनंतर आग आटोक्यात

By admin | Published: October 23, 2015 12:27 AM

श्रीमंतांची वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या पामबीच रोडवरील एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये लागलेली आग चार तासांनंतर आटोक्यात आली. आगीमध्ये दोन

नवी मुंबई : श्रीमंतांची वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या पामबीच रोडवरील एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये लागलेली आग चार तासांनंतर आटोक्यात आली. आगीमध्ये दोन फ्लॅटचे जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दसऱ्याच्या पूर्वरात्री झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एनआरआय कॉम्प्लेक्स फेज टू मधील ५२ क्रमांकाच्या इमारतीमध्ये १५ व्या मजल्यावर बुधवारी रात्री ८ वाजता आग लागली होती. आगीमध्ये फ्लॅटमधील साहित्य पूर्णपणे जळून गेले असून वरील सोळाव्या मजल्यावरील एका फ्लॅटचेही नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई, पनवेल, सिडको, मुंबई अग्निशमन दलाच्या जवळपास १२ गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. नवी मुंबई महापालिका व मुंबईमधील ब्रँटो स्काय लिफ्टचा वापर करून आग विझविण्यात आली. अग्निशमन दल वेळेत आले नाही. नवी मुंबई अग्निशमन दलाची ब्रँटो स्काय लिफ्ट चालत नसल्यामुळे मुंबईवरून स्कायलिफ्ट मागविण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती. नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या क्षमतेविषयी व उपकरणांच्या दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती. पालिकेच्या अग्निशमन दलाने मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर रहिवाशांनी पाणी मारून ती विझविण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्धा तासानंतर अग्निशमन दलाला कळविले. आम्ही तत्काळ मुंबई, पनवेल व इतर ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलावून घेतल्या. नवी मुंबई पालिकेचे ब्रांटो स्कायलिफ्टचा वापर करून आग नियंत्रणात आणली. आग भीषण असल्याने ती इतर ठिकाणी पसरल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईवरून ब्रँटो स्काय लिफ्ट मागविण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग विझविण्यात आली. परंतु पहाटे पाचपर्यंत कुलिंगचे काम सुरू असल्याचेही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. एनआरआयमधील आग भीषण असल्यामुळे आमदार मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, संजय पत्तीवार, अंकुश चव्हाण, सुभाष इंगळे, व इतर पदाधिकारीही उपस्थित होते. अग्निशमन ‘सक्षम’ कराआमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई अग्निशमन दलामधील कर्मचारी चांगले काम करत आहेत. परंतु त्यांना अजून चांगले प्रशिक्षण दिले पाहिजे. पालिकेकडे आग विझविण्यासाठीची अत्याधुनिक उपकरणे असली पाहिजेत. अग्निशमन दलामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली असून त्यांनी पालिका आयुक्त व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनाही याविषयी योग्य कार्यवाही करावी असे सांगितले.