- सचिन लुंगसेमुंबई : आर्थिक वर्ष संपत आले असताना दस्त नोंदणीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मुंबईकरांनी मुद्रांक शुल्क कार्यालयात गर्दी केली आहे. मात्र, सर्व्हर डाऊन होत असल्याच्या घटना वाढल्याने पंधरा मिनिटांचे काम पूर्ण होण्यास चार तास वेळ लागत आहे. काही ठिकाणी दिवसभराचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच, कार्यालयातील गैरसोयींनीही नागरिक हैराण झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रभादेवी-वरळी येथील कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली असता सोयींपेक्षा गैरसोयींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले. वरळी येथील आदर्श नगरमधील नोंदणी व मुद्रांक विभागामधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात पहाटेपासून नागरिक रांगा लावतात. कार्यालय बंद होईपर्यंत येथील काम आटोक्यात येत नसल्याचे येथील कर्मचारी सांगतात. पहिल्या माळ्यावर मुंबई शहर क्रमांक २, ३, ४ आणि ५ चे कार्यालय असून, कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच गैरसोयींची सुरुवात होते. मुख्य प्रवेशद्वारावरच गंज चढून रयाला गेलेली जीप कोपऱ्यात पडली असून, नागरिकांचे स्वागत पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती करतात. येथील जिन्यातही काळोख आहे. ते अरुंद आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन व्यक्तीना जिना चढता किंवा उतरता येत नाही. गेल्या ३ महिन्यांत दस्त नोंदणीच्या संख्येत वाढ झाली आहे.लिफ्टअभावी गैरसाेयज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, लिफ्टअभावी धापा टाकत ज्येष्ठ नागरिकांना मुद्रांक शुल्क कार्यालय गाठावे लागत आहे. अस्वच्छ प्रसाधनगृह प्रसाधनगृह अत्यंत अस्वच्छ आहेत. येथील दुर्गंधी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत येते. त्याचाही नागरिकांना मोठा त्रास होतो.
पंधरा मिनिटांचे काम, म्हणे चार तास थांब; बसायला जागा नाही, अपंगांचे बेहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:55 AM