Join us

रियाज काझी, प्रशांत ओव्हाळ यांच्यासह चौघांकडे चौकशी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सचिन वाझेच्या तत्कालीन सहकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. साहाय्यक निरीक्षक रियाज काझी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सचिन वाझेच्या तत्कालीन सहकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. साहाय्यक निरीक्षक रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांच्यासह चौघांची सोमवारी एनआयएने पुन्हा सुमारे ५ तास चौकशी केली. वाझेकडून नष्ट केलेल्या वस्तू व अन्य वस्तूंबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे.

२५ फेब्रुवारीला उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिन कांड्या असलेली स्काॅर्पिओ पार्क केलेली सापडली होती. त्यानंतर २ ते ३ दिवसांतच सीआययूच्या अधिकाऱ्यांनी विक्रोळी व ठाणे येथे तपासणी केली. त्या ठिकाणच्या बंटी रेडियम या नंबरप्लेट बनविणाऱ्या दुकानात रियाज काझी व अन्य अधिकारी गेले होते. दुकानचालक सावंत याच्याकडे विचारणा करून त्यांनी त्याला सोबत नेल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आले आहे. त्या वेळी त्याच्याकडे काय तपास केला, त्याच्या नोंदी का ठेवण्यात आल्या नाहीत, याबद्दल सोमवारी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केल्याचे समजते. काझीकडून मिळालेल्या माहितीतून वाझेकडे विचारणा करून गुन्ह्याबाबतचा तपास करण्यात येत आहे.