एनआयएकडून आठवडाभरात समन्स
फेरा जिलेटिनचा
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्या अटकेनंतर पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कडून आता आणखी दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह चौघा जणांकडे कसून चौकशी केली जाणार आहे. येत्या आठवडाभरात त्यांना समन्स बजाविण्यात येणार असून त्यामध्ये ठाण्यातील दोघा डॉक्टरांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित दोघे पोलीस अधिकारी सध्या सेवेत असून त्यांचा या गुन्ह्यात सहभागाची खात्री पटल्यास अटकेची कारवाई केली जाणार आहे.
स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत ५ आजी-माजी पोलिसांसह दहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये गेल्या गुरुवारी प्रदीप शर्माला अटक केल्याने पोलिसांबरोबरच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. सचिन वाझे व शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेनची हत्या केल्याची माहिती अटक केलेल्या हल्लेखोरांच्या चौकशीतून स्पष्ट झाल्याचा एनआयएचा दावा आहे; मात्र या संपूर्ण कटाचा उलगडा अद्याप झालेला नाही. या गुन्ह्याच्यावेळी मुंबई व ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे. तसेच हिरेनच्या पोस्टमार्टेमचा अहवाल बनविलेल्या ठाण्यातील रुग्णालयातील दोघा डॉक्टरांकडे नव्याने चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
यासाठी केली जाणार चौकशी?
मुंबईतील एका अधिकाऱ्याने वाझे व त्याच्या सहकार्याने सूचना केल्या होत्या. तर ठाण्यातील अधिकाऱ्याने हिरेनचा मृतदेह गाडीतून नेला जात असताना कोणीही अडवू नये, यासाठी त्यांना ‘एस्कॉर्ट’ केले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघा अधिकाऱ्यांना लवकरच चौकशीला पाचारण केले जाणार आहे.