वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:02+5:302021-07-25T04:06:02+5:30
मुंबई : वरळी येथील हनुमान गल्लीतील अंबिका बिल्डर्स या बांधकाम साईटवर शनिवारी बांधकामाची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा ...
मुंबई : वरळी येथील हनुमान गल्लीतील अंबिका बिल्डर्स या बांधकाम साईटवर शनिवारी बांधकामाची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. अविनाश दास (३५), भारत मंडल (२८), चिन्मय मंडल (३३) अशी या दुर्घटनेतील तीन मृतांची नावे असून, एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईत लिफ्ट कोसळण्याच्या दुर्घटनांत सातत्याने वाढ होत असून, लिफ्टची देखभाल दुरुस्ती रखडणे हे या मागचे प्रमुख कारण मानले जात आहे. शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजता वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ११८ आणि ११९ च्या विरुद्ध बाजूस असलेल्या शंकरराव पदपथ मार्गावरील अंबिका बिल्डर्स येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले. स्थानिकांनी ही मदत करण्यासाठी धाव घेतली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लिफ्टमध्ये एकूण सहा जण होते. यातील दोन जणांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे तसेच एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे केईएम रुग्णालयाचे डॉ. युसुफ यांनी सांगितले. अन्य तिघा जखमींना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या तिघांचाही मृत्यू झाल्याचे नायर रुग्णालयातून सांगण्यात आले. दरम्यान, बेपत्ता असलेल्या सहाव्या व्यक्तीबद्दल मात्र ठोस माहिती महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून ही प्राप्त झाली नाही.
शहरासह उपनगरात लिफ्ट दुर्घटनांचे प्रमाण अधिक असून, इमारतीचे रहिवासी, भाडेकरू, मूळ मालक यांच्यातील मतभेद आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च अशा अनेक कारणांमुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती होत नाही. बांधकामांच्या ठिकाणीही लिफ्ट कोसळून कामगारांचे मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशा घटनांमध्ये विकासकांकडून देखभाल दुरुस्तीबाबत हलगर्जीपणा दाखवला जातो. परिणामी अशा घटनांत वाढ होते. दरम्यान, वरळी येथील लिफ्ट दुर्घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत चौकशी सुरु आहे.