आर्थिक मदतीसाठी चार लाख रिक्षाचालकांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:16+5:302021-07-31T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आर्थिक मदतीसाठी २२ मे पासून रिक्षाचालक ऑनलाइन अर्ज करीत असून, ३० जुलैपर्यंत राज्यभरातून ४ लाख ५ हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी २ लाख ४२ हजार अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
आधारकार्ड, वाहन परवाना, बँक खाते यांच्या नावात काही बदल असल्यास अशाच अर्जांची आरटीओ स्तरावर पडताळणी करण्यात येत आहे. अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमातून अर्ज मंजूर झाला की फेटाळला, याची माहिती दिली जात आहे. अर्ज फेटाळलेल्या रिक्षाचालकांनी पुन्हा अर्ज करावा किंवा स्थानिक आरटीओमध्ये संपर्क साधावा, असे परिवहन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.
सरकारने कोरोनाकाळात रिक्षाचालकांना आर्थिक मदत देऊन मोठा दिलासा दिला आहे. तांत्रिक अडचणींमुळे रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. ती लवकर मिळावी यासाठी संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
- राजेंद्र देसाई, सरचिटणीस, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना