Join us

नव्या वर्षात चार चंद्र-सूर्य ग्रहणे - दा.कृ. सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:08 AM

मुंबई / ठाणे : २०२१ या नवीन वर्षामध्ये आकाशात एकूण चार चंद्र-सूर्य ग्रहणे होणार आहेत. परंतु, आपल्याकडे ईशान्य ...

मुंबई / ठाणे : २०२१ या नवीन वर्षामध्ये आकाशात एकूण चार चंद्र-सूर्य ग्रहणे होणार आहेत. परंतु, आपल्याकडे ईशान्य भारतातील एका ग्रहणाचा अपवाद वगळता एकही ग्रहण दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

२६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकाता, आसाम, मिझोरम, मेघालय, नागालॅण्ड, अरुणाचल येथून दिसणार आहे. तसेच नूतन वर्षी १० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु, ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. त्यामुळे २०२१ हे नूतन वर्ष ग्रहणमुक्त आहे.

पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला, तर त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. अशा वेळी चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतो. २०२१ मध्ये २७ एप्रिल आणि २६ मे रोजी असा आकाशात दोन वेळा सुपरमून दिसणार आहे.

चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारकेला झाकून टाकते, त्याला पिधान युती म्हणतात. यावर्षी १७ एप्रिल रोजी चंद्र-मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही. परंतु, सायं. ७.२१ वाजता मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही दुर्मीळ घटना पर्वणी ठरणार आहे.

नऊ वेळा होणार उल्कावर्षाव

दरवर्षीप्रमाणे यंदाही ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ॲागस्ट, २२ ऑक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी रात्री आकाशातून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळणार आहे. २०२१ मध्ये १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी गुरू ग्रह आणि २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही, असे सोमण यांनी सांगितले.