- मनीषा म्हात्रेमुंबई : खेळता खेळता अचानक एकाच कुटुंबातील चारही मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडल्याने कुटुंबीयांसह पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र मुलांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने वरिष्ठांचाही दबाव वाढला. आठवडा उलटत असताना चौघेही ठाणे परिसरात असल्याची माहिती गुरुवारी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. मुले सापडल्याने कुटुंबीयांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे.कळवा परिसरात सोलंकी दाम्पत्य पाच मुलांसोबत राहते. मुलुंडच्या पदपथावर फुले, जुने कपडे विक्री करून त्यांच्या उदरनिर्वाह होतो. ७ डिसेंबरच्या रात्री १०च्या सुमारास सोलंकी कुटुंबीय मुलुंड पश्चिमेच्या एसव्हीपी रोड परिसरातील पदपथावर नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते. अशातच खेळता खेळता चार मुले गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये १२ आणि ७ वर्षांची दोन मुले तर ५ आणि ११ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश होता.खूप शोध घेऊनही मुले न सापडल्याने कुटुंबीयांनी अखेर मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मुलुंड पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला. अन्य पोलीस ठाण्यांतही मुलांचे फोटो आणि माहिती देत मुलांचा शोध सुरू केला. मात्र काही केल्या मुलांचा शोध लागत नव्हता.दिवस जात होते तसतसे पोलिसांचे आव्हानही वाढत होते. त्यात वरिष्ठांचा दबाव वाढत होता. मिसिंग पथकानेही सीसीटीव्ही फूटेजकडे लक्ष ठेवले होते.पोलिसांचा हा शोध सुरू असताना गुरुवारी दुपारी १च्या सुमारास चारही मुले ठाणे परिसरात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या साहाय्याने त्यांनी मुलांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. मुले मिळाल्यामुळे कुटुंबीयांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला. मात्र ही मुले बेपत्ता झाली कशी, याच गूढ अद्यापही कायम आहे.या सात दिवसांमध्ये ही मुले कुठे व कशा अवस्थेत होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अशातच ही मुले खेळता खेळता तिथे गेली असावी, असा अजब दावाही पोलीस करीत आहेत.ती व्यक्ती कोण?ओळखीच्याच व्यक्तीकडून या मुलांबाबत कुटुंबीयांना समजले. एक व्यक्ती दुपारी कुटुंबीयांना भेटली आणि व्हॉट्सअॅपवर मुलांबाबत समजल्याचे सांगून मुले ठाण्याला असल्याची माहिती देत निघून गेल्याचे तक्रारदार नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुन्हा ठाणे कनेक्शन... गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलुंडमधून बेपत्ता झालेल्या ४ वर्षांच्या मुलीला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. अवघ्या ६० हजार रुपयांमध्ये या मुलीला विकण्यात आले होते. मात्र मुलुंड पोलिसांनी त्यांचा माग काढत या टोळीचा पर्दाफाश करत मुलीची सुखरूप सुटका केली. या प्रकरणातही पुन्हा ठाणे कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
बेपत्ता चार भावंडे आठवडाभराने सापडली, सीसीटीव्हीच्या साहाय्याने घेतला शोध, हरवण्यामागचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:25 AM