मुंबईतील दुर्लक्षित घटकांसाठी चार फिरते लसीकरण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:34 PM2021-08-09T22:34:57+5:302021-08-09T22:35:34+5:30
कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या दुर्लक्षित लोकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेमार्फत चार फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या दुर्लक्षित लोकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेमार्फत चार फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सोमवारपासून ही केंद्रे संपूर्ण मुंबईत फिरू लागली आहेत.
जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी व्हॅक्सिन ऑन व्हिल्स् आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांनी महापालिकेसमवेत भागीदारी केली आहे.
या मोहिमेचे लाभार्थी....
एचआयव्ही रुग्ण, नाईलाजाने देहविक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱया महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा निरनिराळ्या समाज घटकांना विनामूल्य लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. अशा घटकांची प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधित बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.
अशी मिळणार लस..
प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये एक प्रशिक्षित डॉक्टर, दोन परिचारिका, दोन वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध असतील. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे, जेणेकरुन कोविन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
दिवसभरात यांचे लसीकरण....
पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील ५० विक्रेते आणि देह विक्रय करणाऱया २५ महिला यांचे लसीकरण करण्यात आले. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये, संबधित समाज घटकांच्या परिसरात महापालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचणार आहे. १२ ऑगस्टपासून यारितीने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱया महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित राहील.