Join us  

एसी लोकलसाठी चार महिन्यांचा अवधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 3:57 AM

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर एसी लोकल प्रत्यक्षात सेवेत येण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी दिली.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर एसी लोकल प्रत्यक्षात सेवेत येण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी दिली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एसी लोकल मुंबई दाखल होईल. मेल-एक्स्प्रेसच्या डब्यातील अस्वच्छता दूर करून ती जागा स्वच्छ ठेवणाऱ्या ‘क्लीन माय कोच’ सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाला. त्यासोबत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तलही उपस्थित होते. तर यावेळी मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद उपस्थित होते. या शुभारंभादरम्यान महाव्यवस्थापकांनी एसी लोकलचीही माहिती दिली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकल आल्यानंतर त्याची तीन ते चार महिने चाचणी घेण्यात येईल. या एसी लोकलच्या दराबाबत निर्णय झालेला नाही. त्याबाबत सुरू असलेली चर्चा ही चुकीची असल्याचे महाव्यवस्थापक अग्रवाल म्हणाले. या वेळी क्लीन माय कोच सेवेचा आज रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुंबई विभागात २८ मेल-एक्स्प्रेसमध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. क्लीन टाइप करून त्यापुढे पीएनआर क्रमांक लिहून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस केल्यानंतर अर्ध्या तासात डबा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ केला जाणार आहे.