मध्य रेल्वेच्या ताफ्यात चार नव्या रंगांच्या एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:39 AM2019-11-15T05:39:09+5:302019-11-15T05:39:16+5:30
मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एलटीटी-हबीबगंज एक्स्प्रेस, एलटीटी-आग्रा लष्कर एक्स्प्रेस, एलटीटी-लखनऊ एक्स्प्रेस आणि एलटीटी-प्रतापगड या चार एक्स्प्रेसचे रूपडे पालटले आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एलटीटी-हबीबगंज एक्स्प्रेस, एलटीटी-आग्रा लष्कर एक्स्प्रेस, एलटीटी-लखनऊ एक्स्प्रेस आणि एलटीटी-प्रतापगड या चार एक्स्प्रेसचे रूपडे पालटले आहे. या गाड्यांना आता लाल-करड्या रंगात रंगवण्यात आले आहे. या एक्स्प्रेसला एलएचबी कोच जोडले गेले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाला आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) या प्रकारातील डबे चार एक्स्प्रेसला जोडण्यात आले आहेत. यामुळे आरामदायी प्रवास, एक्स्प्रेसची क्षमता, वेग, आसन क्षमता, दरवाजांची जागा वाढणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) पद्धतीचे डबे तयार केले जात होते. हे डबे निळ्या रंगाचे आहेत. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या आणि वेग वाढविण्याच्या दृष्टीने एलएचबी डबे बनविण्यात आले. आयसीएफ डब्यांच्या तुलनेने एलएचबीचे डबे हलके आहेत. गाडीचा वेग हा १३० किमी इतका होणार असल्याचा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. एलएचबी कोचमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. यासह एलएचबी डबे टप्प्याटप्प्याने इतर एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील चार एक्स्प्रेसला एलएचबी कोच आहेत. यामध्ये स्लीपर क्लासचे १२ डबे, तृतीय श्रेणी एसीचे डबे ३, द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, सामान्य द्वितीय श्रेणीचे तीन डबे, जनरेटर व्हॅनचे दोन डबे, पॅण्ट्री कारचा एक डबा असे एकूण २२ कोच असतील.
>एक्स्प्रेसचा वेग वाढण्यास होणार मदत
एलएचबी डबे बाहेरून स्टीलचे असून आतून अॅल्युमिनिअमचे आहेत. अॅल्युमिनिअमचे डबे वापरल्यामुळे वजन कमी झाले आहे. परिणामी एक्स्प्रेसचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. डब्यामधील बेसिन, टॉयलेट यांच्या रचनेत सुधारणा करण्यात आली आहे. दरवाजातील जुनी चिंचोळी जागा आता जास्त मोकळी झाली आहे. त्यामुळे चढता-उतरताना गर्दीला सामोरे जावे लागणार नाही. एलएचबी डबे अॅण्टी टेलिस्कोपिक पद्धतीचे आहेत. त्यामुळे अपघाताच्या वेळी डबे उलटले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यता कमी होते.