उच्च न्यायालयात चार नवे न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:42 AM2018-09-18T00:42:32+5:302018-09-18T00:42:58+5:30
केंद्र सरकारला नेमणुकीसाठी शिफारस
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वश्री एस. एम. मोडक, एन. जे. जामदार, व्ही. जी. जोशी आणि आर. जी. अवचट या चौघांच्या नावांची शिफारस मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणुकीसाठी केंद्र सरकारला केली आहे. हे चौघेही सध्या राज्यात जिल्हा न्यायाधीश आहेत.
हायकोर्ट कॉलेजियमने या चौघांसह एकूण सहा जिल्हा न्यायाधीशांंची शिफारस गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यापैकी या चौघांच्या शिफारशीस मान्यता दिली व श्रीमती पी. व्ही. गनेडीवाला आणि एस. बी. अग्रवाल या दोघांच्या नावांवर काही काळानंतर विचार करण्याचे ठरविले. या सहा जणांहून सेवाज्येष्ठ अशा काही न्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्यात आली नव्हती व त्याची कारणेही मुख्य न्यायाधीशांनी पत्रात नमूद केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनेही ती कारणे समर्थनीय ठरविली. यापैकी काही जणांविरुद्धच्या तक्रारींत तथ्य न आढळल्याने त्या दुर्लक्षित करण्यात आल्या. नव्या नेमणुका केंद्र सरकारच्या प्रक्रियेनंतर यथावकाश होतील.