मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी युवासेना मलबारहिल विधानसभेतर्फे कपडे, ब्लँकेट, तयार अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी, ब्लिचिंग पावडर, सॅनिटरी नॅपकिन, जनावरांसाठी खाद्य, औषधे, धान्य, सॅनिटायझर्स, मास्क, साबण इत्यादी वस्तू जमा करुन गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. तरी नागरिकांना मदत करायची असल्यास त्यांनी जवळील शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोंडी कायम
मुंबई : लालबहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून घाटकोपरपर्यंत फूटपाथ लगतच्या रस्त्यांवर होत असलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. येथे सातत्याने अवजड वाहने उभी केली जात असून, वारंवार कारवाई करूनदेखील या समस्यांना आळा बसत नसल्याचे चित्र आहे.
रस्ता खड्ड्यात
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजारामधील मगन नथुराम मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, हे खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य पुन्हा रस्त्यावर पसरले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. परिणामी पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य
मुंबई : कुर्ला पश्चिम आणि पूर्व या दोन ठिकाणांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाखालून गेला असून, येथील मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी, कचरा पसरला आहे. शिवाय भुयारी मार्गात फेरीवाले बसत असून, या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी पादचाऱ्यांनी केली आहे.