Join us

चार माहिती अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नेमणुका रद्द

By admin | Published: August 05, 2015 1:11 AM

राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात सात वर्षांपूर्वी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर चार उमेदवारांची निवड करताना अनुसरली गेलेली

मुंबई : राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात सात वर्षांपूर्वी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर चार उमेदवारांची निवड करताना अनुसरली गेलेली निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमबाह्य आणि बेकायदा होती, असा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) या चार नेमणुका रद्द केल्या आहेत.सरकारने भरती नियमांचे कसोशीने पालन करून या चार पदांसाठी पुन्हा नव्याने निवड प्रक्रिया सुरु करावी, असाही आदेश ‘मॅट’ने दिला आहे. एवढेच नव्हे तर मुख्य सचिवांनी या प्रकरणी अवलंबिल्या गेलेल्या पूर्णपणे नियमबाह्य निवड प्रक्रियेची चौकशी करावी आणि त्यात निवड समितीच्या सदस्यांनी बजावलेली भूमिकाही तपासावी, असाही आदेश दिला गेला आहे.या निकालानुसार ज्या चार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द झाल्या आहेत त्यांत मिनल शशिकांत जोगळेकर, कीर्ति प्रकाशराव मोहरीर, वर्षा संतोष आंधळे आणि किरण जनार्दन मोघे यांचा समावेश आहे. यापैकी जोगळेकर, मोहरीर व आंधळे यांच्या नेमणुका जुलै २००८ मध्ये तर मोघे यांची नेमणूक जानेवारी २००९ मध्ये झाली होती. मोघे यांना खेळाडू कोट्यातून तर बाकीच्या तिघींना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडले गेले होते. मोघे यांना नाशिकमध्ये तर इतर तिघींना मुंबईत नेमणुका दिल्या गेल्या.वय जास्त असल्याचे कारण देऊन या निवड प्रक्रियेत सहभागीही होऊ न दिलेल्या जळगाव येथील डॉ. संजय कृष्णाजी भोकरडोळे यांनी केलेल्या दोन याचिका मंजूर करून ‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल आणि न्यायिक सदस्य आर. बी. मल्लिक यांनी हा निकाल दिला. चार वर्षांपूर्वी मुळात औरंगाबाद येथे केल्या गेलेल्या या याचिका नंतर‘मॅट’च्या मुंबईतील मुख्य पीठाकडे वर्ग केल्या गेल्या होत्या.या सुनावणीत याचिकाकर्ते भोकरडोळे यांच्यासाठी अ‍ॅड. अरविंद आणि गौरव बांदिवडेकर यांनी, सरकारसाठी सरकारी वकील के. बी. भिसे यांनी तर निवड रद्द झालेल्या चार प्रतिवादींसाठी अ‍ॅड. स्वाती मंचेकर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)