Join us

मुंबई बंदरात एकाच वेळी चार आलिशान क्रुझचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:59 AM

समुद्री पर्यटनाला वाढता प्रतिसाद; गेल्या तीन वर्षांत पर्यटकांच्या संख्येत वाढ

मुंबई : मुंबई बंदरामध्ये एकाच वेळी चार आलिशान प्रवासी जहाजांचे आगमन झाले आहे़ याद्वारे सुमारे सहा हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केला. मुंबई पोर्ट ट्रस्ट व नौकावहन मंत्रालयातर्फे समुद्री पर्यटनवाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे़ त्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे मानले जात आहे.अडीच हजार प्रवाशांना घेऊन मस्कत येथून आलेले मैन स्क्चीफ ६ हे जहाज, ८०० प्रवाशांना घेऊन गोव्याहून आलेले कर्णिका, मस्कत येथून ५७० प्रवाशांना घेऊन आलेले सिल्व्हर स्पिरीट व गोव्याहून १२४ प्रवासी घेऊन आलेले आंग्रिया जहाज अशी चार आलिशान जहाजे एकाच वेळी मुंबई बंदरात दाखल झाली. या चार जहाजांमधून कर्णिकाच्या पुढील प्रवासासाठी १७०० प्रवाशांनी आरक्षण केले, आंग्रियाच्या प्रवासासाठी १३६ प्रवाशांनी आरक्षण केले, तर सिल्व्हर स्पिरीटच्या प्रवासासाठी ५०० प्रवाशांनी आरक्षण केले होते. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रवाशांनी प्रत्यक्ष प्रवास केला तर सहा हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी मुंबई बंदराचा वापर केला. मुंबई बंदरात येणाऱ्या भारतीय व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ४ लाख चौरस फुटांचे आलिशान व भव्य आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल उभारण्यात येत असून पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत याचे काम पूर्ण होऊन ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आला. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे क्रुझ पर्यटनाला अधिकाधिक सुविधा पुरवण्यात येत असून गेल्या तीन वर्षांत क्रुझद्वारे पर्यटनाला जाणाºया व मुंबईत येणाºया प्रवाशांच्या तसेच क्रुझच्या संख्येत वाढ होत आहे.आगामी काळात यामध्ये अधिक वाढ होईल व मियामी या क्रुझ पर्यटनाच्या जागतिक राजधानीप्रमाणे मुंबईलादेखील महत्त्वाचे स्थान यामध्ये मिळेल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला.