पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह चार जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 09:58 PM2018-02-20T21:58:39+5:302018-02-20T22:21:08+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह आणखी चार जणांना सीबीआयने अटक केली आहे. यावेळी सीबीआयने विपुल अंबानीसह कपिल खंडेलवाल, नितीन शाही, कविता माणकिकर आणि अर्जुन पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह आणखी चार जणांना सीबीआयने अटक केली आहे. यावेळी सीबीआयने विपुल अंबानीसह कपिल खंडेलवाल, नितीन शाही, कविता माणकिकर आणि अर्जुन पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत. याआधी याप्रकरणी सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट यांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची सीबाआय कोठडी सुनावली आहे. मात्र, या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी फरार आहे. तर पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईतील फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने टाळे ठोकले आहे.
CBI arrested Vipul Ambani, President, Finance,Firestar International/diamonds group,Kavita Mankikar, Authorised Signatory of 3 accused firms,Arjun Patil, Sr. Executive, Firestar group, Kapil Khandelwal, CFO, Nakshatra group &Niten Shahi, Manager, Gitanjali
— ANI (@ANI) February 20, 2018
दरम्यान, याप्रकरणी नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोलकाता, दिल्ली, जम्मू, लखनऊ, बंगळुरू आणि सुरतसह ३८ ठिकाणी ‘ईडी’ने सोमवारी धाडी घातल्या. वरळीच्या ‘समुद्र महल’मधील मोदीच्या घराचीही झडती घेतली. मोदी व मेहुल चोक्सी यांच्या आणखी २२ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या. आतापर्यंत ५,७१६ कोटी रुपये कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे.
मोदी व चोकसींनी २४ कंपन्या, १८ व्यावसायिकांनाही बुडवले
नीरव मोदी व मेहूल चोकसी जोडगोळीने सरकारी बँकाच नव्हे, तर २४ कंपन्या व १८ व्यावसायिकांनाही दिवाळखोर केले आहे. २0१३ ते २0१७ या काळात या कंपन्या व व्यक्तींनी मोदी-चोकसी यांच्या कंपन्यांची फ्रँचाइजी घेतली होती. दिल्ली, आग्रा, मेरठ, बंगळुरू, म्हैसूर, कर्नाल तसेच गुजरात व राजस्थानातील अनेक ठिकाणांसाठी या फ्रँचाइजी घेण्यात आल्या होत्या. फ्रँचाइजीसाठी मोदी-चोकसीच्या कंपन्यांनी ३ ते २0 कोटी डिपॉझिट घेतले होते. तथापि, नंतर त्यांना हिरे आणि रत्ने दिलीच नाहीत. या कंपन्या-व्यावसायिकांनी दोघांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत.
पीएनबीने गमावले १0,७८१ कोटींचे बाजार भांडवल
पंजाब नॅशनल बँकेने गेल्या बुधवारी नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली. तेव्हापासून बँकेचे समभाग घसरणीला लागले आहेत. मुंबई शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत बँकेचे समभाग २८ टक्क्यांनी घसरले आहेत. १0,७८१.१२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल बँकेने गमावले आहे.
कोण आहे नीरव मोदी
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले. नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याने 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.
47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरे व्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
मल्ल्यापेक्षाही मोठा घोळ
याबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.
तीन बँका संकटात
या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.
सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात
पीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.