अपघातात कुटुंबातील चौघे ठार
By admin | Published: April 30, 2015 12:36 AM2015-04-30T00:36:35+5:302015-04-30T00:43:20+5:30
कार-कंटेनरची राजापूरजवळ टक्कर : मृतांमध्ये वर्षाची चिमुरडी; मायलेकीची प्रकृती गंभीर; वायंगणीकडे जाताना भीषण अपघात
राजापूर : गृहप्रवेशासाठी मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या वायंगणी या गावाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारची कंटेनरशी समोरासमोर टक्कर झाल्याने चारजण ठार झाले, तर मायलेकी गंभीर जखमी झाल्या. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरनजीक कोदवली येथे बुधवारी सकाळी ७.३0 वाजता हा अपघात झाला.
सतीश प्रकाश धुळे, त्याचा भाऊ नीलेश प्रकाश धुळे, सारिका सतीश धुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अवघ्या वर्षाची चिमुरडी सिया सतीश धुळे हिचा रुग्णालयात उपचार सुरू असताना अंत झाला. नीती नीलेश धुळे आणि त्यांची ११ वर्षीय कन्या तन्वी या दोघीही रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी हे धुळे कुटुंबाचे मूळ गाव. नोकरीनिमित्त ते मुंबईतील शिवडी येथे राहतात. गावातील त्यांच्या घरी दोन दिवसांनंतर गृहप्रवेशासाठी सत्यनारायण महापूजा होणार होती. पूजेच्या तयारीसाठी त्यांचे आई-वडील आधीच गावी दाखल झाले आहेत. सतीश हे टोयाटो कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करीत होते, तर त्यांचे भाऊ नीलेश हे खासगी कंपनीत नोकरी करीत होते. पूजेसाठी सतीश आपल्या मित्राची कार घेऊन कुटुंबासह मंगळवारी रात्री मुंबईहून गावाकडे येण्यासाठी निघाले. मात्र, रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मंगळवारी रात्री मुंबईहून निघालेल्या धुळे कुटुंबीयांची टोयाटो कार (एमएच 0२ सीआर ७७८८) कोदवली येथील अवघड वळणावर समोरून येणाऱ्या कंटेनरवर (एमएच 0४ इएल ८८७१) धडकली. कारचालक सतीश धुळे (वय ३२), त्यांची पत्नी सारिका (३०) आणि भाऊ नीलेश (३६) हे जागीच ठार झाले. सतीश यांची वर्षाची मुलगी सिया हिची प्राणज्योत उपचार सुरू असताना मालवली.
या अपघातात सतीश यांचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. नीलेश याची पत्नी नीती व मुलगी तन्वी या अपघातात बचावल्या आहेत. मात्र, त्या दोघीही गंभीर जखमी असून, त्यांना तत्काळ रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी व राजापूर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातातील कंटेनर चालक केशव नबाजी खुडे (वय ३०) याला राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो गोव्याहून शंभर रिकामे ड्रम घेऊन भिवंडीकडे चालला होता.
(प्रतिनिधी)
गृहप्रवेशाचा मुहूर्तच टळला
आचरा : वायंगणी भंडारवाडी येथील धुळे कुटुंबीयांमधील चौघांचा मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे अपघातादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. वर्षभरापूर्वी आपल्या मूळ गावी बांधलेल्या आलिशान बंगल्याच्या गृहप्रवेशासाठी धुळे कुटुंबीय बुधवारी गावी येत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच वायंगणी परिसरावर शोककळा पसरली आहे.
वायंगणी भंडारवाडी येथील धुळे कुटुंबीय व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावले. वर्षभरापूर्वी त्यांनी आपल्या मूळ गावी असलेले घर दुरुस्त करून नवीन आलिशान बंगला बांधला होता. त्यानंतर त्या बंगल्यात ब्राह्मण भोजन झाले होते. मात्र, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी गुरुवार ३० एप्रिलचा मुहूर्त काढण्यात आला होता. त्यासाठी अपघातात मृत झालेले सतीश धुळे यांचे आई-वडील दोनच दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आले होते. त्यांनी गृहप्रवेशासाठी आवश्यक तयारी केली होती. गुरुवारच्या कार्यक्रमासाठी सतीश धुळे, त्यांचे बंधु व कुटुंबीय आपल्या खासगी गाडीने मुंबईहून आचऱ्याकडे येत होते. बुधवारी राजापूर येथे झालेल्या अपघातात गाडीमधील चौघांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्यांना मुंबई येथे नेण्यात आले. संपूर्ण वायंगणीसह आचरा परिसरावर शोककळा पसरली आहे. घरी असलेल्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (वार्ताहर)
रुग्णालयात गर्दी
सतीश टेनिस क्रिकेटपटू म्हणून सर्वत्र ओळखले जातात. ते यापूर्वीही अनेकवेळा राजापूर येथे खेळण्यासाठी आले होते. राजापुरातही त्यांचे अनेक मित्र होते. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाची माहिती कळताच अनेकांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
संपूर्ण कुटुंबावरच काळाचा घाला
या भीषण अपघातामध्ये सतीश धुळे व त्यांच्या सर्व कुटुंबावरच घाला पडला. सतीश यांच्यासोबत त्यांची पत्नी सारिकाही जागीच ठार झाली, तर त्यांची एकुलती एक वर्षाची मुलगी सिया गंभीर जखमी झाली होती. मात्र, उपचार घेत असतानाच आई-वडिलांपाठोपाठ तिनेही जगाचा निरोप घेतला. सतीश व सारिका यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. वर्षभरातच सियाचा जन्म झाला होता.