मुंबई : काळाचौकी येथील गं.द. आंबेकर मार्गावर असलेल्या वेस्टर्न इंडिया मिल चाळीतील एका घरात तब्बल १० फूट खोल आणि १० फूट रुंद खड्डा पडल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. या दुर्घटनेत घरातील चार भाडेकरू खड्ड्यात पडून किरकोळ जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाने दिली.येथील नाना तावडे यांच्या मालकीचे हे घर असून त्यात चार भाडेकरू राहत असल्याचे स्थानिक मनसे विभागाध्यक्ष नंदकुमार चिले यांनी सांगितले. चिले म्हणाले, सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त घराशेजारी राहणारे मनसेचे गटाध्यक्ष सचिन मोहिते यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. घरात पडलेला खोल खड्डा पाहून सर्वच जण अवाक् झाले. उंच शिडीच्या मदतीने चौघा भाडेकरूंना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महापालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून चौघेही भाडेकरू किरकोळ जखमी झाले आहेत.वीजपुरवठा खंडीतया दुर्घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वीजपुरवठा खंडीत केला असून तेथील दुकानेही बंद केली आहेत.चाळीशेजारी रस्त्याचे काम सुरू असून त्यामुळेच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे. तरी हाखड्डा कशामुळे पडला? याचा तपास संबंधित यंत्रणाकरीत आहे.
घरात खड्डा पडून चौघे जण जखमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 7:11 AM