Join us  

कोकण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेची चार टप्प्यात चाचपणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 5:30 PM

कामाला गती देण्यासाठी एमएसआरडीसीचा निर्णय

मुंबई : कोकणाला समृद्ध करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कोकण एक्स्प्रेस महामार्गाची व्यवहार्यता चाचणी चार टप्प्यात करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. कामाचे विभाजन केल्यास लवकर अहवाल प्राप्त होईल आणि पुढील नियोजनही वेगवान पद्धतीने करता येईल. त्यासाठी व्यवहार्यता चाचणी एकत्र न करता चार टप्प्यात करणार असल्याचा दावा या विभागातील अधिका-यांकडून केला जात आहे.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा कोकण ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे बांधण्याची घोषणा सरकारने मार्च महिन्यांत केली होती. या महामार्गाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एमएसआरडीसीएने २४ जून,२०२० रोजी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती. या कामाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासणीसाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागारांना पाचारण करण्यात आले होते. संपूर्ण ५०० किमी लांबीच्या महामार्गाची चाचणी एकाच सल्लागारामार्फत करण्याचे नियोजन होते. मात्र, एमएसआरडीसीने आता त्यात बदल करून चार टप्प्यात ही चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून तशा सुधारित निविदा प्रसिध्द केल्या आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून शिवडी – न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील चीर्ले गावापर्यंत हा मार्ग जाणार आहे. तिथून कोकणातील जिल्ह्यांचा कायापालट करण्याची क्षमता असलेला ५०० किमी लांबीचा हा महत्वाकांक्षी एक्स्प्रेस वे उभारण्याचे नियोजन आहे. १०० ते १२५ किमी लांबीचे चार टप्पे निश्चित करण्यात आले असून त्यानुसार व्यवहार्यता चाचणी केली जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यासाठी चिर्ले (रागयड) - रत्नागिरी जिल्ह्याची सीमा – गुहागर चिपळूण – सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा – पत्रादेवी (महाराष्ट्र गोवा सीमा) असे चार टप्पे निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :महामार्गरस्ते वाहतूकरस्ते सुरक्षा