डहाणू : गुजरातहून मुंबई येथे जाणारी इनोव्हा कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भराड येथे अडवून आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस असून तुमच्या वाहनातून गुटखा आणि बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक करीत असल्याचे सांगून मारहाण करून पंचवीस हजार रुपये लुटण्याची घटना शनिवारी घडली. याबाबत कासा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, हे आरोपी पोलीसच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. दरम्यान पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक महंमद सुवेझ हक यांनी या चारही वाहतूक पोलिसांना निलंबित केले आहे.कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भराड येथे सेल्व्हासा कडून मुंबई विमानतळाकडे प्रवाशांना घेण्यासाठी जात असलेल्या इनोव्हा कारला अडवून व चालक आणि त्याच्या सहप्रवाशाला या चौघांनी ताब्यात ठेवून आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत अशी बतावणी केली. एवढेच नाही तर गुटख्याची वाहतूक करीत असल्याचा आरोप करून दमदाटी करून त्यांचे २५ हजार रुपये काढून घेतले. याबाबत कारमधील मदनलाल वर्मा(५०) यांना संशय आल्याने त्यांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरिक्षक रविकांत मगर यांनी तपास करुन राजू चव्हाण, सुरेश राठोड, जितेंद्र चौगुले, राजू नासिर शेख यांना अटक केली. चौकशी दरम्यान या चौकडीचे बिंग फुटले. वरील चौघे आरोपी हे वाहतूक पोलीस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना डहाणू न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पंधरा दिवसापूर्वीच एका तोतया पोलीस व पत्रकाराच्या टोळीने गुटखा भरलेल्या एका वाहनचालकाकडून दहा लाखाची खंडणी मागीतल्या प्रकरणी मनोर पोलिसांनी दहा जणांची तुरूंगात रवानगी केली होती. आता पोलिसच अशी लूट करू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. (वार्ताहर)
चालकाला लुटणारे चार पोलीस निलंबित
By admin | Published: April 21, 2015 11:02 PM