मुंबई : मालाड-मालवणीमधील एका रेशन दुकान चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या चौघांना मालवणी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या चौघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले.मालवणीच्या गेट क्रमांक ८ येथे मांगीलाल देवासी (३५) यांचे रेशन दुकान आहे. देवासी हे काळाबाजार करतात आणि याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांना देऊ, अशी धमकी देत रेहमत खान (३१), अस्लम शेख (३०), काफील अकील अन्सारी (२९) आणि रेहमत शेख (२१) या चौघांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी यांनी या प्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप पाचंगणे, पोलीस निरीक्षक महेश ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक अवधूत वाडेकर यांनी सापळा रचत त्या चौघांना पैसे घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार हे चौघे पैसे घेण्यासाठी आले असता त्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
मालवणीतील चार खंडणीखोरांना अटक
By admin | Published: January 13, 2016 2:15 AM