‘परे’च्या चार स्थानकांचा होणार पुनर्विकास

By admin | Published: May 17, 2017 02:18 AM2017-05-17T02:18:47+5:302017-05-17T02:18:47+5:30

केंद्राकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, मुंबई सेंट्रल, अंधेरी आणि वांद्रे या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

Four stations of 'Bare' will be redeveloped | ‘परे’च्या चार स्थानकांचा होणार पुनर्विकास

‘परे’च्या चार स्थानकांचा होणार पुनर्विकास

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्राकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, मुंबई सेंट्रल, अंधेरी आणि वांद्रे या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या स्थानकांवरील प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर सुविधा मिळणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली असून, पश्चिम रेल्वे स्थानकांवरील १६ प्रवासी सुविधांचे नवी दिल्लीतील रेल भवन येथून रेल्वेमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी उद्घाटन केले. बोरीवली अद्यायावत रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण करण्यात आले.
चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात झालेल्या कॉन्फरन्सला भाजपाचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार माजिद मेमेन, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि आमदार राज पुरोहित यांच्यासह परेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता उपस्थित होते. देशाच्या आर्थिक राजधानीतील शहरात सर्वात जास्त प्रवास रेल्वेने केला जातो. त्यामुळे प्रवाशांना सुविधा देणे ही रेल्वेची प्राथमिकता आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार संयुक्तपणे रेल्वेविकास प्रकल्प राबवणार आहे. प्रवाशांना सुखद आणि आरामदायक प्रवासासाठी रेल्वे प्रशासन
प्रयत्नशील आहे, असे प्रभू म्हणाले.
रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास विविध टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वेच्या चार स्थानकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ‘अ वर्ग’ दर्जाच्या स्थानकांत विमानतळाच्या धर्तीवर सुविधा पुरवण्यात येणार आहे. स्थानके पुनर्विकासासाठी निविदा मंजूर झाल्या असून, २०१९
पर्यंत पहिल्या टप्प्यातील स्थानके
पूर्ण करण्यात येतील, असा विश्वासही रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

- पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) वतीने बोरीवली, दादर, भार्इंदर, अंधेरी, वसई रोड, नालासोपारा, कांदिवली, गोरेगाव स्थानकांवर प्रवासी सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यात स्कायवॉक, नवनिर्मित लिफ्ट, सरकते जिने, एलिव्हेटेड डेक, पादचारी पूल, बुकिंग कार्यालय, प्रवासी आरक्षण केंद्र, शौचालय अशा सुविधांचा समावेश आहे.

अशा मिळणार सुविधा
- स्वीस चॅलेंज पद्धतीने होणार स्थानकांचा विकास
- स्थानकांतील मोकळ्या जागेचा पुनर्विकास करून त्यातून उत्पन्न
- प्रवाशांसाठी फलाटावर अत्याधुनिक सुविधा, यात एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी जोडलेले रॅम्पसह बुक शॉप, खाद्य पदार्थ स्टॉल
- विशेष प्रवाशांसाठी लिफ्ट आणि सरकते जिने
- प्रवाशांभिमुख साइन बोर्ड, प्रथमोपचार केंद्र, प्रार्थना कक्ष
- स्थानकांवर विकासकांसाठी पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग मॉल

राम नाईक यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची (एमआरव्हीसी) स्थापना करण्यात आली. मध्यंतरी एमआरव्हीसीचा कामांचा वेग मंदावला होता. मात्र, रेल्वेमंत्री प्रभू यांनी कार्यभार स्वीकारताच एमआरव्हीसीच्या माध्यमाने प्रवासी सुविधा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यात आले.
- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

कोणत्याही स्थानकांवरून कोणत्याही स्थानकाचे तिकीट मिळावे. शहरात येणाऱ्या खेड्यातील नागरिकांसह पर्यटकांसाठी ५ ते १५ दिवसांचा रेल्वे पास असावा. ठाणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी वसई रोड ते जेएनपीटी रोरो सेवा सुरू करावी. या तीन सुविधांचा विचार करण्यात यावा.
- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (खासदार)

Web Title: Four stations of 'Bare' will be redeveloped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.