‘फोर स्टोरीज’ चित्रप्रदर्शनाचे आज जहांगीरमध्ये उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:46 PM2022-08-30T12:46:25+5:302022-08-30T12:47:10+5:30
कोरोना महामारीत सर्व जगच स्तब्ध झाले होते. साऱ्यांच्याच भवतालाला वेदनेचे ग्रहण लागले होते. अशावेळी मनात उमटणाऱ्या वेदनांना अनेक कलाकारांनी आपापल्या कलाविष्कारांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली.
मुंबई : कोरोना महामारीत सर्व जगच स्तब्ध झाले होते. साऱ्यांच्याच भवतालाला वेदनेचे ग्रहण लागले होते. अशावेळी मनात उमटणाऱ्या वेदनांना अनेक कलाकारांनी आपापल्या कलाविष्कारांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. अशाच संवदेनशील कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आज, ३० ऑगस्टपासून मुंबईत सुरू होत आहे. या चित्रांच्या माध्यमातून वेदनाच नव्हे, तर आशेचा नवा किरण, नवी उमेद या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, सर्च संस्थेच्या मुख्य वास्तुविशारद जयश्री भल्ला, छायाचित्रकार रचना दर्डा, कलाकार बिना या चौघांनी रेखाटलेली भावोत्कट चित्रे या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येतील. मुंबई आर्ट एक्सप्रेशन्सच्या संस्थापक तृप्ती जैन या प्रदर्शनाच्या समन्वयक आहेत.
३० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऑडिटोरियम हॉल येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल, आरपीजी समूहाचे चेअरमन हर्षवर्धन गोएंका, रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया, आंतरराष्ट्रीय कलाकार सुजाता बजाज, ‘इस्कॉन’चे स्वामी नित्यानंद चरण दास हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सर्वांसाठी खुले राहील.
समाजासाठी मदत..!
या चित्रप्रदर्शनात ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या सादर होणाऱ्या चित्रांच्या विक्रीद्वारे मिळणारा निधी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
रचना दर्डा यांच्या चित्रांच्या विक्रीद्वारे मिळणारा निधी यवतमाळ येथील मागासवर्गीय मुलांना उच्चदर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी वापरण्यात येणार आहे.
जयश्री भल्ला यांच्या चित्र विक्रीद्वारे मिळणारा निधी कर्जत येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
बिना यांच्या चित्रांद्वारे मिळणारा निधी सोसायटी फॉर ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे मेडिकल सेंटर उभारण्यासाठी खर्च केला जाईल.