पोषण आहारातून चार विद्यार्थ्यांना विषबाधा, जोगेश्वरीच्या पालिका शाळेतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:09 AM2017-12-14T02:09:06+5:302017-12-14T02:09:20+5:30
जोगेश्वरी पूर्वच्या एका पालिका शाळेत बुधवारी शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ल्याने चार विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यानंतर सावधानता बाळगत सर्वच ३१ विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या एका पालिका शाळेत बुधवारी शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ल्याने चार विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यानंतर सावधानता बाळगत सर्वच ३१ विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. मात्र, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
जोगेश्वरी पूर्वच्या सर्वोदयनगरमध्ये पालिकेची बालविकास विद्यामंदिर ही इंग्रजी आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. एका पालकाने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०च्या सुमारास ‘मिड-डे मिल’ म्हणून मधल्या सुट्टीत मुलांना खिचडी वाटण्यात आली. शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर साडेबाराच्या सुमारास चार मुलांना मळमळून उलटी झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून या चार मुलांसह इतर सर्व २७ मुलांनाही जोगेश्वरीच्या कोकणनगर परिसरात असलेल्या कोकण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. ही मुले पाचवी आणि सातवीच्या वर्गातील असल्याचे, मेघवाडी विभागाचे साहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी सांगितले.
डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे निदान होताच, प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
खिचडीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार
तपासाअंती शाळेला खिचडी पुरविण्याचे काम कांजूर मार्गची एक संस्था करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, या खिचडीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
मुलाच्या पोटात दुखत असल्याचा फोन!
मी भार्इंदरला निघालो होतो. अचानक शाळेतून फोन आला की, तुमचा मुलगा कुणालची तब्येत बिघडली आहे, शाळेत या. मी लगेच पत्नीला फोन करून शाळेत पाठविले. तेव्हा कुणालसह अजूनही काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे शिक्षकांनी सांगितले. माझा मुलगा इयत्ता सातवीत शिकतो. खिचडी खाल्लानंतर त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता.
- दीपेश पडवळ, कुणालचे वडील
रुग्णालयात घेतली धाव!
माझा मुलगा चिराग साळवी हा सातवीत शिकतो. खिचडी खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागले. शाळेतून फोन आल्यानंतर माझे पती शाळेत पोहोचले. मात्र, माझ्या मैत्रिणीनेही मला फोन करून, बºयाच मुलांना विषबाधा झाल्याचे सांगितले. त्यामुळे मी सरळ कोकण रुग्णालयात गेले.
- सुप्रिया साळवी, चिरागची आई