कोरोना महामारीत सर्व जगच स्तब्ध झाले होते. साऱ्यांच्याच भवतालाला वेदनेचे ग्रहण लागले होते. अशा वेळी मनात उमटणाऱ्या वेदनांना अनेक कलाकारांनी आपापल्या कलाविष्कारांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. अशाच संवेदनशील कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे पार पडले. केवळ वेदनाच नव्हे तर आशेचा नवा किरण, नवी उमेद या कलेच्या माध्यमातून चित्र रसिकांच्या भेटीला आली. त्या प्रदर्शनाविषयीचा हा लेख.
शर्वरी अविनाश जोशी, ठाणे
आर्ट गॅलरीत प्रदर्शन बघायला जाणार असाल तर दोन तीन तासांचा वेळ काढूनच जा. कलाकृती पहिल्या फेरीत समजेलच असं नाही. शक्य तितक्या अधिक वेळा पूर्ण दालनात चक्कर मारा. जमल्यास कलाकाराला भेटा, गप्पा करा. प्रत्येक कलाकृती दरवेळी तुम्हाला वेगळं काहीतरी गूज सांगेल. कलाकाराचे निरनिराळे पैलू तुम्हाला उलगडत जातील.
जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशनच्या प्रशिक्षणातले हे काही अगदीच बेसिक धडे! ते गिरवण्याची एक संधी नुकतीच चालून आली. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा व त्यांचे तीन कुटुंबीय यांच्या चित्रप्रदर्शनाला भेट देण्याची संधी नुकतीच मिळाली. कोविड निर्बंधांच्या काळात बहुतेकांनी आपापल्या छंदांना वेळ दिला. तसेच मीही हातात ब्रश घेऊन कॅनव्हासवर फटकारे मारणं सुरू केलं होतं. त्याला शिस्त लावली ती माझी गुरू व मैत्रीण दीपावली देशपांडेनी. पुढच्या दोन वर्षांत मी अनेक जाॅनर हाताळले आणि मला इतरांची चित्रे पारखता यावीत इतपत समज आली.
‘फोर स्टोरीज’ नावाचे हे प्रदर्शन माझ्यातल्या नवशिक्या चित्रकारासाठी प्रशिक्षण, प्रयोग, प्रेरणा असं बरंच काही होतं. काय होतं या प्रदर्शनात खास? विजय दर्डा हे पत्रकार आणि व्यावसायिक आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांचे चित्रे रेखाटतानाचे फोटो व व्हिडिओजही सोशल मीडियात दिसतात. चांगला पत्रकार हा उत्तम कम्युनिकेटर असतोच हे त्यांची चित्रे पाहतांना जाणवते. इथे माध्यम लेखणीऐवजी ब्रश, रंग, कॅनव्हास आहे इतकंच! प्रदर्शनात दर्डांव्यतिरिक्त सर्च इन्स्टिट्यूट या विख्यात फर्मच्या चीफ आर्किटेक्ट जयश्री भल्ला, फोटोग्राफर व चित्रकर्ती रचना दर्डा व बीना यांचीही सुंदर चित्रे होती. ही सर्व मंडळी अत्यंत संवेदनशील असल्याचे त्यांची पेंटिंग्ज पाहताना सतत जाणवले. यांच्यापैकी कोणीही चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही हे विशेष! कोरोना काळात एकएकटं रहावं लागल्याने आत्मचिंतनाचीही उत्तम संधी सर्वांनाच मिळाली. त्यातूनच मानवी संबंधांमध्ये, समाजात निर्माण झालेले ताणतणाव, मानवी मूल्यांची सुरू झालेली पडझड, भयावह अनिश्चितता, जीवनाची क्षणभंगुरता अशा उद्विग्न करणाऱ्या गोष्टी तर कधी या सर्व नकारात्मकतेवर मात करून बाकी उरणारं निखळ सत्य म्हणजे प्रेम, भाईचारा, सद्भावना ही चिरंतन मूल्ये विजयजींच्या पेंटिंग्जमधून स्थापित करतानाचा प्रयत्न दिसला. ॲक्रेलिक रंगातली त्यांची बहुतेक पेंटिंग्ज ॲबस्ट्रॅक्ट फाॅर्म मध्ये असली तरी ‘गुड ॲन्ड ईवल’, ‘फिअरलेस’ व इतरही दोन तीन पेंटिंग्ज याच मूल्यांचा स्पष्ट जयघोष करतात. प्रत्येक पेंटिंगची पार्श्वभूमी, संकल्पना, रंगांची निवड याविषयी ते भरभरून बोलतात व आपल्याला समजावून सांगतात. विजय दर्डा यांच्या भगिनी जयश्री या निसर्गप्रेमी आहेत. वन्यजीव आणि मनुष्य यांचं सुदृढ, प्रेमळ नातं हे ईश्वरी तत्वाशी नाळ जोडणारं आहे हे त्यांची पेंटिंग्ज सांगतात. बहुतेक पेंटिंग्ज तैलरंगात आहेत.
रचना दर्डा यांचा पिंड वेगळा आहे. कलाकुसर, अत्यंत क्लिष्ट, जटिल अशा डिटेलिंगवर त्यांचा फोकस दिसतो. काळ्या शाईने रेखाटलेली त्यांची चित्रे इतकी बोलकी आहेत की बघणारा निःशब्द होतो. बीना यांची ईश्वराप्रतीची श्रद्धा, त्या ज्या स्वरूपात ईश्वराला पाहू इच्छितात व इतरांना ते स्वरूप दाखवू इच्छितात ती त्यांची भावना त्यांच्या पेंटिंग्जमधून दिसते. ईश्वरी तत्त्वाचा अंश प्रकट करताना सोनेरी रंगाचा मुबलक वापर त्यांनी केलेला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या पेंटिंग्जच्या विक्रीतून जी काही धनराशी जमा होईल तिचा विनियोग हा चंद्रपूर गडचिरोली नक्षलग्रस्त विभागात कार्यरत असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केला जाणार आहे. कला आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकीची जपणूक असा हा अनोखा उपक्रम नक्कीच स्वागतार्ह व प्रशंसनीय होता.