लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील अंगणवाड्या दत्तक देऊन त्यात आमूलाग्र बदल करण्याच्या संकल्पनेला आता मोठे यश येऊ लागले आहे. बड्या कंपन्या, सामाजिक संस्था, ट्रस्ट यांनी तब्बल ४ हजार ३०५ अंगणवाड्या आतापर्यंत दत्तक घेत आदर्श निर्माण केला आहे.
राज्यात १ लाख १० हजार अंगणवाड्या आहेत. गरोदर माता, स्तनदा मातांचे पोषण, लसीकरण, आरोग्य तपासण्या, पूर्व शालेय शिक्षण, संदर्भ सेवा व आरोग्य शिक्षण असे सहा उपक्रम अंगणवाड्यांच्या माध्यमातून राबविले जातात. या सेवांचा दर्जा सुधारायचा असेल तर समाजाला आवाहन करायला हवे, हा विचार घेऊन दत्तक योजना आणली गेली.
ब्रिटानिया फाउंडेशन, अंबुजा सिमेंट फाउंडेशन, रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एनहान्समेंट, साने गुरुजी फाउंडेनशन, संवाद सामाजिक मंडळ, लायन्स क्लब जुहू, लाइफ ट्रस्ट फाउंडेशन, लवकरच अन्य जिल्ह्यांमधील संस्थांशी असे करार करणार आहे. साने गुरुजी फाउंडेशन, द कॉर्बेट फाउंडेशन, संवाद सामाजिक मंडळ, लायन्स क्लब जुहू, लाइफ ट्रस्ट फाउंडेशन, राही सामाजिक संस्था, राइज फाउडेशन, फाउंडेशन फॉर मदत अँड चाइल्ड हेल्थ, के कॉर्प फाउंडेशन, भव्यता फाउंडेशन, अनइन्व्हेंटेड ट्रस्ट आदी संस्थांनी अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. यांनी राज्य सरकारसोबत करार केले आहेत.
या जिल्ह्यांत प्रतिसाद
अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांत दत्तक योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.
आदिवासी भागातील काही अंगणवाड्यांचे रूप अन् दर्जा बदलू शकलो याचे समाधान आहे. या कार्यात समाजाने मोठे योगदान देण्याची गरज आहे. - केदार गोरे, संचालक, कॉर्बेट फाउंडेशन.
अंगणवाड्यांचे संचलन सरकारच्या निधीतून केले जाते. पण, त्यात समाजाचेही योगदान असायला हवे, या विचारातून अंगणवाड्या दत्तक देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक भान जपणाऱ्या संस्था अन् कंपन्या त्यासाठी सढळ हाताने मदत करत आहेत. - मंगलप्रभात लोढा, मंत्री, महिला व बालकल्याण.