मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मागणीसाठी एकीकडे गेल्या १७ दिवसांपासून संप सुरु आहे. मात्र, दुसरीकडे काही कर्मचारी कामावर हजर होत आहेत. रविवारी राज्यभरात ४ हजार एसटी कर्मचारी कामावर हजर झाले असून, आज दिवसभरात एक हजार ७६४ प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी असून, याकडे सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, संपात फूट पडली असून, शुक्रवारपासून तुरळक प्रमाणात एसटी वाहतूक सुरु झाली आहे. शुक्रवारी १,५००, शनिवारी तीन हजार आणि रविवारी ३,९८७ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे रविवारी राज्यभरातून ६० मार्गांवर शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण ७९ बसेस धावल्या आहेत.
मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्नnएसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील तीन ते चार महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलक महिलांना रोखले. एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला आठवडा उलटूनही तोडगा निघत नसल्याने महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास महिलांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे समुपदेशन करत त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
परिवहन मंत्र्यांकडून फूट पाडण्याचा प्रयत्नपरिवहन मंत्री अनिल परब खूप चांगले राजकारणी आहेत. पण, एसटी कर्मचाऱ्यांबाबत असे तुच्छ पद्धतीचे राजकारण आपण करू नये. कारण आपल्या असंवेदनशीलपणामुळे ३६ जणांनी जीव गमावले आहेत. तरीही आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खाची जाणीव होत नाही. राज्यभरातील तीन हजार कर्मचारी कामावर परतले, अशा खोट्या बातम्या आपण वृत्तपत्रात पसरवत असून, कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून उद्रेक पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.- गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
nएसटी महामंडळात रविवारी प्रशासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २४८३ होती, तर कार्यशाळेत १,२३२, चालक १९५ आणि वाहक ७७ असे एकूण ३,९८७ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.