Join us

कॉर्नियल प्रत्यारोपणाच्या मागणीसाठी चारपट दात्यांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डोळ्यांच्या बाहुलीवरील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्नियल इजेपायी देशात अंदाजे २० लाख व्यक्ती दृष्टिहीन झाल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डोळ्यांच्या बाहुलीवरील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्नियल इजेपायी देशात अंदाजे २० लाख व्यक्ती दृष्टिहीन झाल्या आहेत. या विकारात दिरंगाई न केल्यास, वेळेवर प्रत्यारोपण उपचार झाल्यास एक-चतुर्थांशहून अधिक कॉर्नियल अंधत्त्वाची समस्या दूर होऊ शकते. शरीराच्या अन्य अवयवांप्रमाणे डोळ्याच्या कॉर्नियाचे दान मृत्यूपश्चात करणे शक्य आहे.

दरवर्षी दहा हजार कॉर्नियल अंधत्त्वाची प्रकरणे अस्तित्त्वात असलेल्या केसमध्ये भर घालतात. त्यामुळे कॉर्नियल प्रत्यारोपणाला वार्षिक मागणी वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी लोकांमध्ये दृष्टिदानाविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात असलेल्या या राष्ट्रीय दृष्टिदान पंधरवड्याच्या निमित्ताने डोळे दान करणार असल्याचे वचन घ्यायला हवे, असे मत ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीता शहा यांनी व्यक्त केले आहे.

दृष्टिदान कोण करू शकते?

दृष्टिदाता हा कोणत्याही लिंगाचा किंवा वयाचा असू शकतो. दात्याला एड्स, हेपेटायटीस बी आणि सी, रेबीज, सेप्टीसेमिया, ॲक्यूट ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), टीटॅनस, कॉलरा आणि मेनेंजेटीस तसेच एन्सेफलिटीस यांसारखे संसर्गजन्य विकार असू नयेत.

डोळा पेशीजालापासून बाहेर काढणे

मृत्यू-पश्चात सहा ते आठ तासांत डोळा काढून घेणे हितावह ठरते. डोळे काढून घेतल्यानंतर ते मूल्यांकनाकरिता आय बँकेत पाठविले जातात. त्यानंतर त्यांचे पुढील वितरण होते. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तज्ज्ञांकडून डोळ्याचे मूल्यमापन होते. प्रतीक्षा यादीत नमूद अंध व्यक्तिंना पाचारण करण्यात येते. तातडीने डोळ्यांची गरज असलेल्यांना मार्गदर्शक तत्त्वांत नमूद प्रक्रियेच्या आधारे सेवा देण्यात येते.

दृष्टिदानाचे महत्त्व

डॉ. नीता शहा म्हणाल्या की, जनजागृतीचा अभाव, सामाजिक किंवा धार्मिक समजुती आणि अन्य कारणांमुळे देशात दृष्टिदानाला फारसे महत्त्व दिले जात नाही. देशात दरवर्षी सुमारे ५०,००० डोळ्यांचे दान केले जाते. वर्षाला देशभर अंदाजे १ कोटी लोक मृत होत असून ०.५ टक्क्यांहून कमी प्रमाणात डोळे जमा केले जातात. त्यामुळे दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. दृष्टिदानातून प्रत्यारोपण होत नसल्यास ते संशोधन आणि शिक्षणासाठी पाठवावेत. संपूर्ण दृष्टी संशोधनात प्रगतीची आवश्यकता आहे.