Join us

राज्यमार्गाचे चौपदरीकरण

By admin | Published: February 19, 2015 10:58 PM

मुंबई ते गोवा आणि मुंबई ते पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा वाकण ते पाली हा राज्य महामार्ग ४० किमी लांबीचा आहे.

पाली : मुंबई ते गोवा आणि मुंबई ते पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा वाकण ते पाली हा राज्य महामार्ग ४० किमी लांबीचा आहे. या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी अत्यंत धोकादायक वळणे असल्यामुळे नेहमीच अपघात होत असतात. या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास अपघात रोखण्यास मदत होईल, अशी स्थानिकांची मागणी आहे. पाली हे अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वराचे तीर्थक्षेत्र आहे. यामुळे येथे येणाऱ्या गणेशभक्तांची संख्याही जास्त आहे. साधारण अष्टविनायकासाठी येणाऱ्या मोठ्या बसेस व छोट्या चारचाकी गाड्या यांची प्रचंड संख्येने वाहतूक सुरु असते. त्याचप्रमाणे पुणे येथे जाण्यासाठी या राज्य महामार्गाचा वापर होत असून नागोठणे, रोहा परिसरातील व पाली औद्योगिक क्षेत्रातून जाणारे केमिकल्स व अवजड वाहतुकीकरिता हा रस्ता वापरला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक या राज्य महामार्गावर चोवीस तास सुुरु असते.वळणावळणाच्या रस्त्याचा अंदाज नवीन चालकाला येत नसल्यामुळे भरधाव वेगाने येणारी ही वाहने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. मोटारसायकलचे अपघात हे घडणे नित्याचेच सुरु आहे. अनेक तरुण मुलांना या अपघातात आपला जीव गमावावा लागत आहे. पेडली व परळी या गावातून जाणाऱ्या या राज्य महामार्गावरील वळणे ही अतिक्रमणामुळे व वाहने रस्त्यावर उभी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. हे सर्व टाळण्यासाठी राज्य महामार्गाचे चौपदरीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्याकडे शिवसेना जिल्हा सल्लागार किशोर जैन यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. राज्य महामार्गावरील वाहतूक व अवजड वाहनांची वाहतूक अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता कितीही दुरुस्त केला तरी तो टिकाव धरु शकत नाही हे सर्व सत्य असले तरीही पर्यटन स्थळ व राज्य महामार्ग याचा विचार करुन सार्वजनिक बांधकाम खात्याला पूर्णपणे हा रस्ता बनविणे शक्य नसेल तर बीओटी तत्त्वावर देऊन हा कायमचा त्रास तरी थांबवावा, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.मिरकुटवाडीजवळ अ‍ॅडलॅब इमॅजिका प्रकल्प सुरु झाला आहे. खोपोली फाटा ते इमॅजिका या रस्त्याची अवस्था दयनीय असून गाड्यांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या राज्यमार्ग हा दुपरी आहे. मात्र मार्गावरील वर्दळ प्रचंड वाढल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. वाकण परिसरात असलेल्या वळणावर चालकांचा वाहनावरील ताबा सुटतोराज्यमार्गाचे चौपदरीकरण झाल्यास आणि वळणावर सूचनाफलक, दिशादर्शक लावल्यास अपघात रोखण्यात मदत होईल. शिवाय चालकांनाही पुढील मार्ग समजू शकेल.