खर्चाच्या चौपट टोलवसुली
By admin | Published: April 13, 2015 12:01 AM2015-04-13T00:01:04+5:302015-04-13T00:01:04+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील पेण - खारपाडा येथील पाताळगंगा नदीवर बीओटी तत्त्वावर बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोलवसुली मुदत पूर्ण होईपर्यंत कायम ठेवली आहे.
दत्ता म्हात्रे, पेण
राष्ट्रीय महामार्गावरील पेण - खारपाडा येथील पाताळगंगा नदीवर बीओटी तत्त्वावर बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोलवसुली मुदत पूर्ण होईपर्यंत कायम ठेवली आहे. १९९९ ते २७ आॅगस्ट २०१५ या १६ वर्षे सहा महिन्यांत आयआरबी ठेकेदार कंपनीला ३३ कोटी ३३ लाख एवढ्या ब्रिजच्या केलेल्या खर्चाच्या चारपट म्हणजे तब्बल १२० कोटींची टोलवसुली मिळणार आहे. टोलवसुली करताय मात्र अरुंद ब्रिजचे आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीचे काय, असा सवाल येथील नागरिक आणि वाहतूकदार उपस्थित करीत आहेत.
युती सरकारच्या काळात १९९५ साली कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व खारपाडा अरु ंद ब्रिज ही समस्या डोकेदुखी ठरत होती. तत्कालीन बांधकाम मंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीओटी तत्त्वावर आयआरबी ठेकेदार कंपनीकडून पाताळगंगा नदीवर १९९५ ते १९९९ या कालावधीमध्ये खारपाडा पूल बांधण्यास परवानगी दिली. आॅगस्ट १९९९ पासून खारपाडा टोलनाक्यावर टोलवसुलीला सुरु वात झाली. छोट्या वाहनांना १० रुपये व मोठ्या वाहनांना ३० रुपये या दराने टोल आकारणीद्वारे गेल्या सोळा वर्षांत ११६ कोटी ६८ लाख रुपयांची टोलवसुली डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत झाल्याचे महामार्ग सूत्रांनी सांगितले.
या पुलासाठी आलेला खर्च हा ३३ कोटी एवढा असताना आतापर्यंत ११६ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरवर्षी ७ कोटी २८ लाख याप्रमाणे १६ वर्षे आठ महिने आयआरबी ठेकेदार कंपनीला टोल वसूल करण्याचा करार शासनाकडून करण्यात आला आहे. पेणचा धरमतर टोल गेल्यावर्षी बंद झाला आहे. कोटीच्या कोटी चौपट वसुली होऊनही खारपाडा टोल मात्र २७ आॅगस्टपर्यंत सुरूच राहणार आहे.