चारचाकी महागल्या; युद्धामुळे सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 07:08 AM2022-03-19T07:08:59+5:302022-03-19T07:09:15+5:30
आलिशान कार निर्मात्या मर्सिडीज-बेंझ कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
- चंद्रकांत दडस
मुंबई : युद्धामुळे वाहनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाल्याने देशातील वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी वाहन कंपन्यांनी किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
आलिशान कार निर्मात्या मर्सिडीज-बेंझ कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. किंमत वाढल्याने मर्सिडीज-बेंझच्या कार किमान ५० हजार रुपये ते ५ लाखांपर्यंत महाग होणार आहेत.
टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक कार नेक्सॉन ईव्ही या प्रसिद्ध कारच्या किमतीत वाढ केली असून, टाटा नेक्सॉन ईव्हीच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. नेक्सॉन ईव्ही १४.५४ लाख रुपयांना मिळेल.
का वाढत आहेत गाड्यांच्या किमती
सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाढलेला वाहतूक खर्च तसेच विस्कळीत झालेला सुट्या भागांचा पुरवठा यामुळे वाहन कंपन्यांना सातत्याने वाहनांच्या किमीत दरवाढ करावी लागत आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे.
मारुती सुझुकी : मारुती सुझुकीनेही नुकत्याच आपल्या वाहनाच्या किमतीत ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने जानेवारीत १.४ टक्के, एप्रिलमध्ये १.६ टक्के आणि सप्टेंबरमध्ये १.९ टक्क्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे.
टाटा मोटर्स : टाटा मोटर्सने सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत किमान २.५ टक्के वाढ केली आहे. कंपनीने अगोदरच सफारीसह अन्य मॉडेलच्या किमतीत अगोदरच वाढ केली होती.
स्कोडा : स्कोडाने सर्व वाहनांच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीची अनेक मॉडेल बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, किमतीत वाढ झाल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
व्होल्वो कार इंडिया : व्होल्वो कार इंडियानेही आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या किमती नुकत्याच लागू केल्या आहेत.