Join us

अपहरण झालेल्या चार वर्षीय मुलाची हत्या

By admin | Published: July 18, 2015 2:14 AM

तुर्भे स्टोअर येथून अपहरण झालेल्या चार वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी एपीएमसी येथे आढळला. कांदा-बटाटा मार्केटमधील शौचालयाच्या पाण्याच्या टाकीमध्ये हा मृतदेह होता.

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथून अपहरण झालेल्या चार वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी एपीएमसी येथे आढळला. कांदा-बटाटा मार्केटमधील शौचालयाच्या पाण्याच्या टाकीमध्ये हा मृतदेह होता. मुलगा दत्तक न मिळाल्याने सात दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते.अरमान खान (४) असे मयत मुलाचे नाव आहे. तुर्भे स्टोअर येथे राहणाऱ्या अरमानचे शनिवार, ११ जुलै रोजी रात्री अपहरण झाले होते. त्याचे वडील बबलू खान यांचा कांदा-बटाटा विक्रीचा किरकोळ व्यवसाय आहे. त्यांना मालाची डिलेवरी करणाऱ्या मोहम्मद खान यानेच अरमानला पळवले होते. शनिवारी रात्री अरमान हा मालाची डिलेवरी केल्याचे पैसे घेण्यासाठी तुर्भे स्टोअर येथे आला होता. या वेळी बबलू यांनी त्याला व्यवहाराचे ५ हजार रुपये दिल्यानंतर मुलगा अरमान याला त्याच्याकडे खेळण्यासाठी देऊन ते दुकानात गेले होते. परंतु दुकानातून बाहेर आल्यानंतर मोहम्मद हा अरमानला घेऊन पळाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी मोहम्मदला फोन केला असता काहीच वेळात परत येतो, असेही सांगितले होते. त्यानंतरही तो अरमानला घेऊन परत न आल्याने बबलू यांनी त्याच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरण झालेल्या अरमानच्या सुटकेसाठी मोहम्मदच्या शोधात उत्तर प्रदेश येथेही पथक पाठवले आहे. अखेर शुक्रवारी दुपारी एपीएमसी येथे अरमानचा मृतदेह आढळून आला. कांदा-बटाटा मार्केटमधील एच गल्लीतील शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत होती. सफाई कामगाराकडून या भूमिगत टाकीचे झाकण उघडले असता त्यात मृतदेह तरंगताना दिसला. त्यानुसार एपीएमसी व तुर्भे एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोचले असता तो अरमानचा मृतदेह असल्याचे उघड झाले. मोहम्मद याने अरमानला दत्तक देण्याची मागणी त्याचे वडील बबलू यांच्याकडे केली होती. लहान अरमान आवडत असल्याने तो नेहमी त्याच्यासोबत खेळायचा; शिवाय फिरायलाही घेऊन जायचा. घटनेच्या दिवशीही तो अरमानला घेऊन फिरायला गेला असून त्याला परत आणेल, असे बबलू यांना वाटले होते. मात्र काही वेळानी अरमान माझाच असून त्याला परत देणार नाही, असे बबलू यांना फोनवर सांगितले होते. मोहम्मद हा कांदा-बटाटा मार्केटमधील शौचालयालगतच्याच खोलीमध्ये राहायला होता. त्याच ठिकाणी असलेल्या टाकीमध्ये अरमानचा मृतदेह आढळला आहे. दत्तक मागूनही न मिळाल्याने अरमानला पळवून त्याची हत्या केल्याची शक्यता आहे. त्यानुसार फरार मोहम्मदचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले. ऐरोली येथील फ्रेन्शिला वाझ हिचे अपहरण करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील लहान मुलांच्या बेपत्ता होण्यामागचे गांभीर्य वाढू लागले आहे. (प्रतिनिधी)