चार वर्षांच्या पूर्तीचे सरकारला वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:53 AM2018-10-26T04:53:27+5:302018-10-26T04:53:59+5:30
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत.
मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गेल्या चार वर्षांतील वचनपूर्तीचा अजेंडा घेऊन प्रसिद्धीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
चार वर्षपूर्तीचे कोणतेही सेलिब्रेशन केले जाणार नाही. तर कम्युनिकेशनवर (संवाद) भर दिला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध विभागांनी गेल्या चार वर्षांत घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी ही लोकांसमोर आणली जाणार आहे. चार वर्षांत अंमलात आणलेल्या पाच सर्वोत्कृष्ट कामांची-योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांकडून मागविली होती आणि त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आली याचा आढावादेखील घेतला होता. सरकारने सुशासनाच्या दृष्टीने घेतलेल्या विविध लोकाभिमुख निर्णयांची प्रसिद्धी चार वर्षपूर्तीच्या निमित्ताने केली जाणार आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाईल.
>...तर पाच वर्षे पूर्ण करणारे दुसरेच मुख्यमंत्री
चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करण्याकडे फडणवीस वाटचाल करणार आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला तर इतका कार्यकाळ सलग राज्य करणारे ते दुसरे मुख्यमंत्री असतील. याआधी केवळ वसंतराव नाईक यांनी पाच वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण केला होता. नाईक आणि फडणवीस हे दोघेही वैदर्भीयच हादेखील एक योगायोग आहे.