Join us  

चार वर्षांनंतर गुढीपाडव्याला सोने उच्चांकावर

By admin | Published: March 29, 2017 4:22 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते. यंदा सोने खरेदीच्या

चेतन ननावरे / मुंबईसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते. यंदा सोने खरेदीच्या दराने गुढीपाडव्याच्या दिवशीचा मागील चार वर्षांतील उच्चांक गाठला. तरीही मुंबईतील सराफा बाजारात नेहमीच्या तुलनेत मंगळवारी ग्राहकांनी गर्दी केली होती. गेल्या वर्षी २०१६मध्ये गुढीपाडव्याला सोन्याचा दर प्रतितोळा २९ हजार ७९ रुपये होता. यंदा तो २९ हजार २१५ रुपयांवर पोहोचला.मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी म्हणजेच ११ एप्रिल २०१३ रोजी सोन्याचा दर प्रतितोळा २९ हजार ६६४ रुपये होता. त्यानंतर पुढची सलग तीन वर्षे गुढीपाडव्याला दर कमीच होता. मात्र तीन वर्षांनंतर पुन्हा दरात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत दर कमी असल्याने मुंबईसह राज्यात सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी उत्पादन शुल्काविरोधात पुकारलेल्या संपामुळे गुढीपाडव्याला सराफा बाजार बंद होता. त्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या चार महिन्यांपासून बाजारात मंदी होती. त्यामुळे गुढीपाडव्याला तरी रेकॉर्डब्रेक कमाईची अपेक्षा होती. मात्र रेकॉर्डब्रेक कमाई झाली नसली, तरी सरासरीहून सराफा बाजाराने अधिक कमाई केल्याची माहिती कुमार जैन यांनी दिली.नोटाबंदीच्या काळात सोने प्रतितोळे ३२ हजार रुपयांपर्यंत गेले होते. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसांत हा दर प्रतितोळा २९ हजार रुपयांखाली उतरला होता. यामुळे सराफा बाजाराला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३५० कोटी रुपयांपर्यंत कमाईची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बुलियन बाजारासह हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी नेहमीच्या तुलनेत या गुढीपाडव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सायंकाळपर्यंत सराफा बाजाराने २०० कोटींपर्यंतचे व्यवहार केले होते. रात्रीपर्यंत हा आकडा २२५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सराफा बाजाराने व्यक्त केली.सोन्याचे दर वर्षदर (रुपये/१० ग्रॅम)३१-०३-२०१४  २८,५३०२१-०३-२०१५  २६,१८२०८-०४-२०१६  २९,०७९२८-०३-२०१७  २९,२१५