लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १४ लाख रुपयांची फी लाटल्याप्रकरणी स्वाती कदम (४०) या महिला लिपिकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. तिच्याविरोधात डिसेंबर महिन्यात खासगी शाळेच्या विश्वस्तांनी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कदम हिने शाळेच्या रेकॉर्डमध्ये बनावट चेक क्रमांक टाकून पालकांकडून रोख रक्कम गोळा केली. जेव्हा शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हिशेब तपासला तेव्हा शेकडो चेक नंबर रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले होते, मात्र एकही जमा केलेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा बोरिवलीच्या देवीपाडा येथील शाळेच्या विश्वस्तांनी लिपिकाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी शाळेच्या विश्वस्तांचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला.
सहा वर्षांपासून नोकरीलाnकदम ही गेल्या सहा वर्षांपासून शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होती. कोरोनामुळे शाळा बंद असली तरी २०१९-२० आणि२०-२१ या शैक्षणिक वर्षाची फी प्रलंबित होती, असे शाळेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.nअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पालकांनी रोखीने फी भरली, तेव्हा कदम रेकॉर्डमधील बनावट चेक क्रमांकावर पंच करून पैसे चोरायची. तिने अशा प्रकारे जवळपास १४ लाखांचा अपहार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी या लिपिकाला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून तपास सुरू आहे.