कांदिवलीत चौदा वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:20 AM2018-06-30T06:20:56+5:302018-06-30T06:20:59+5:30
‘ए लडकी पिछे जा’, ‘ए वॉचमन, वो देख कुद रही है, उसे बचा...’ अशी क्लिप शुक्रवारी सकाळी मुंबईकराच्या मोबाइलवर व्हायरल झाली. एक मुलगी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारतानाचा तो व्हिडीओ होता.
मुंबई : ‘ए लडकी पिछे जा’, ‘ए वॉचमन, वो देख कुद रही है, उसे बचा...’ अशी क्लिप शुक्रवारी सकाळी मुंबईकराच्या मोबाइलवर व्हायरल झाली. एक मुलगी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारतानाचा तो व्हिडीओ होता. काही वेळाने समजले की, तो प्रकार कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरातील असून, उडी मारणारी मुलगी हर्षिका धीरेंद्र मायावंशी (१४) ही नववीतील विद्यार्थिनी होती.
हर्षिका ही ठाकूर व्हिलेजच्या गार्डेनिया इमारतीत आईवडील, लहान बहिणीसोबत राहात होती. वडील सिक्युरिटी कंपनीत व्यवस्थापक पदावर असून, आई गृहिणी आहे. गुरुवारी संध्याकाळी हर्षिका ही घराशेजारील आर्केड इमारतीच्या आठव्या मजल्यावर चढली. या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ती खाली उडी मारण्याच्या तयारीत असताना, समोरच्या इमारतीमधील स्थानिकांनी ते पाहिले आणि ओरडत उडी मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे हर्षिकाचे लक्ष नव्हते. तिने उडी मारली. तेव्हा स्थानिक आणि वॉचमनने घटनास्थळी धाव घेतली. हर्षिकाच्या कुटुंबाने स्थानिकांच्या मदतीने जवळच्या साई रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
हर्षिका ही गुंडेचा एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये नववीत शिकत होती. समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठविला. हर्षिकाने हे पाऊल का उचलले? याबाबत कुटुंबाला काहीच माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुसाइड नोटही सापडलेली नाही. तिचे दप्तरही तपासण्यात आले. मात्र, त्यात काहीच संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांनी सांगितले.