Join us

कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात? नवीन चतुर्थश्रेणी भरतीत स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:28 AM

कंत्राटी कामगारांना भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने पुढाकार घेतला आहे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगारांना नवीन भरतीत सामावून घेणार नसल्याचे समजते. त्यामुळे या कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महापालिकेत रोजंदारी, बहुउद्देशीय व कंत्राटी चतुर्थश्रेणी कामगार कार्यरत आहेत. त्यातील काही कामगारांची १० ते १५ वर्षे सेवा झाली आहे. या सर्व कामगारांनी कोरोना काळातही सेवा केली होती. यादरम्यान काही कामगारांचा मृत्यूही झाला होता. मात्र, पालिकेतील नव्या भरतीमुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या कामगारांना पालिकेतर्फे कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, विमा योजना, तसेच वैद्यकीय सुविधांचा त्यांना लाभ मिळत नाही. याशिवाय त्यांना वेळेवर वेतनही मिळत नाही, असे सूत्रांकडून समजते. 

दरम्यान, कंत्राटी कामगारांना भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने पुढाकार घेतला आहे. या कामगारांनी मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

तरुण कामगार उच्चशिक्षित

केईएम रुग्णालयात रोजंदारीवर ११ कामगार, २५० बहुउद्देशीय कामगार आणि २११ कंत्राटी कामगार असून, त्यांची जवळपास १२ वर्षे सेवा झाली असून, अनेकांचे वयही झाले आहे. 

या कामगारांना महिन्याला १८ हजार रुपये वेतन मिळते. काही तरुण कामगार उच्च विद्याविभूषित आहेत. 

किमान या तरुण कामगारांना तरी नव्या भरतीत सामावून घ्यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका