फिरायला आवडते म्हणून सोडले चौथ्यांदा घर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:13 AM2019-01-05T01:13:46+5:302019-01-05T01:14:10+5:30
‘सर मुझे लगता है की मुझे घर मे नहीं बैठना चाहीये, बाहर घुमना चाहीये,’ अशा आशयाचे उत्तर पोलिसांना मालवणीत राहणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलाने दिले.
मुंबई : ‘सर मुझे लगता है की मुझे घर मे नहीं बैठना चाहीये, बाहर घुमना चाहीये,’ अशा आशयाचे उत्तर पोलिसांना मालवणीत राहणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलाने दिले. चौथ्यांदा घरातून पळाल्यानंतर त्याला शोधून आणल्यावर, त्याने असे करण्याचे दिलेले कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
तेजस (नावात बदल ) हा मुलगा मालवणीमध्ये त्याच्या पालकांसोबत राहतो. २८ डिसेंबर, २०१८ मध्ये राहत्या घरातून पळाला. त्याच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला़ तो न सापडल्याने १ जानेवारी रोजी त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल उल्हास परब आणि त्यांच्या पथकाने तेजसचा शोध सुरू केला. कांदिवली पाश्चिमच्या महावीरनगर परिसरात एका रिक्षामध्ये तेजस त्यांना सापडला. घरात कोणालाही काहीच न सांगता तेजस निघून गेल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी तीन वेळा त्याने असा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांना समजले. त्याला कक्ष ११ मध्ये आणून जेव्हा पोलिसांनी त्याला विचारले, तेव्हा मला घरी थांबवेसे वाटत नसून सतत बाहेरच फिरायला आवडते, त्यामुळे मी घरातून सतत निघून जात असल्याचे त्याने त्यांना सांगितले. याबाबत मालवणी पोलिसांनी त्याच्या घरच्यांना कळवत, त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.