वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 07:20 IST2025-02-08T07:19:52+5:302025-02-08T07:20:28+5:30
Which is Fourth Mumbai: डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती.

वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय?
मुंबई : वाढवण बंदरानजीक चौथी मुंबई उभारण्यात येणार आहे. यासाठी १०७गावांतील ५१२ चौ. किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. याला मान्यता मिळताच एमएसआरडीसीचा नवे शहर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नीती आयोगाने मुंबई महानगरला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र (ग्रोथ हब) उभारली जाणार आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठे बंदर वाढवण येथे उभारले जात आहे.
डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. त्यानुसार डहाणू तालुक्यातील ११ आणि पालघर तालुक्यातील ३ गावांमध्ये ही विकास केंद्रे साकारली जाणार होती. यातील वाढवण विकास केंद्र हे ३३.८८ चौ. किमी, तर केळवा केंद्र ४८.२२ चौ. किमी क्षेत्रावर उभारण्याचे प्रस्तावित होते.
नव्या शहराची तलासरीपर्यंत हद्द
वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील तब्बल १०७ गावांमध्ये आणि ५१२ चौ. किमीच्या प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जानेवारीमध्येच एसआरआरडीसीने राज्य सरकारकडे पाठविला आहे. दरम्यान, या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईची हद्द वाढवण बंदराच्या क्षेत्रापासून ते तलासरीपर्यंत विस्तारलेली असेल, अशी माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली.
वर्षात तयार होणार डीपी
प्रस्तावित क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीच्या नियुक्तीला राज्य सरकारची मान्यता मिळताच एका वर्षाच्या आत या भागाचा विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन आखले आहे.
चौथ्या मुंबईत काय ?
- वाढवण बंदरामार्गे आलेल्या माल साठवण्यासाठी लॉजिस्टीक पार्क.
- बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागात ये-जा वाढेल. त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे प्रस्तावित आहे.
- मनोरंजनाच्या अनुषंगाने रिक्रिएशन ग्राउंड असतील. यात गोल्फ कोर्सचा समावेश असेल.
कन्व्हेंशन सेंटर्स उभारली जातील.
- वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दरम्यान मालाची जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असेल.
-नव्या शहरात हेलिपॅड, एअरस्ट्रीप उभारण्याचेही नियोजित आहे. त्यातून दळणवळण जलद होऊ शकेल.