चौथाही पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल
By admin | Published: March 11, 2017 01:29 AM2017-03-11T01:29:51+5:302017-03-11T01:29:51+5:30
व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे मुंबईतील केंद्रांवर साहाय्यक परीक्षकांची नेमणूक केली. तरीही शुक्रवारी वाणिज्य शाखेच्या
मुंबई : व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे मुंबईतील केंद्रांवर साहाय्यक परीक्षकांची नेमणूक केली. तरीही शुक्रवारी वाणिज्य शाखेच्या बुक किपिंगचा पेपर कांदिवली येथील दोन परीक्षा केंद्रांवरील तीन विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडला. हे तीनही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने त्यांची चौकशी करून मोबाइल तपासल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करत तिन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीला सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत चार पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून व्हॉट्सअॅपवर पेपर लीक होण्याचे सत्र सुरू आहे. शुक्रवार, १० मार्चला सकाळी ११ वाजता बुक किपिंगचा पेपर होता. या पेपरवेळी कांदिवली येथील डॉ. टी.आर. नरवणे शाळा परीक्षा केंद्रावर एक आणि बालभारती हायस्कूल परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी परीक्षेला उशिरा पोहोचले. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांविषयी चौकशी करण्यात आली. त्या वेळी या विद्यार्थ्यांची नावे पुढे आली. या विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांचे बाहेर ठेवण्यात आलेले मोबाइल तपासण्यात आले. त्या वेळी मोबाइलवर बुक किपिंगचा पेपर आढळून आला. हा प्रकार दुपारी १२ वाजता उघडकीस आल्याचे मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. मराठी, एसपी, गणित आणि बीके असे चार पेपर आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. यापैकी मराठी, एसपी आणि गणिताचा पेपर हा परीक्षा सुरू होण्याआधी १२ ते १५ मिनिटे आधी व्हॉट्सअॅपवर आला होता. या वेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रात असतात आणि पेपरच्या वेळेआधी १० मिनिटे विद्यार्थ्यांना पेपर देण्यात येतो. बीकेचा पेपर किती वाजता फुटला याचा शोध घेतला जात आहे. आजच्या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
- बीकेचा पेपर व्हॉट्सअॅपवर आल्याचे उघड झाले आहे. तीन विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यानंतर चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले आहे, तर तीन मोबाइल जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी स्पष्ट केले.