‘त्या’ चिमुरडीच्या शरीरातून काढली चौथी गोळी
By admin | Published: June 30, 2017 03:13 AM2017-06-30T03:13:58+5:302017-06-30T03:13:58+5:30
येमेनमधील युद्धात आपल्या घराबाहेर खेळताना अचानक चार वर्षांच्या चिमुरडीने बंदुकीच्या तब्बल चार गोळ्या शरीरावर झेलल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येमेनमधील युद्धात आपल्या घराबाहेर खेळताना अचानक चार वर्षांच्या चिमुरडीने बंदुकीच्या तब्बल चार गोळ्या शरीरावर झेलल्या. मात्र तरीही जगण्याची जिद्द कायम असणाऱ्या या चिमुरडीच्या शरीरातून येमेनमधील रुग्णालयात दाखल करून तीन गोळ्या काढण्यात आल्या. परंतु, चौथी गोळी शरीराच्या पार्श्वभागावर असल्याने कोणतेही रुग्णालय शस्त्रक्रियेचे आव्हान पेलण्यास तयार नव्हते. त्यानंतर पालकांनी तिला मुंबईतील परळ येथील रुग्णालयात दाखल केले. तिथे या चार वर्षांच्या चिमुरडीवर ‘हिप बोन करेक्शन शस्त्रक्रिया’ करून तिच्या शरिरातील चौथी गोळी डॉक्टरांनी यशस्वीपणे काढली.
येमेने येथे दोन महिन्यांपूर्वी धाई मोहम्मद या चार वर्षांच्या चिमुरडीला घराजवळ खेळत असताना चार गोळ्या लागल्या. तीन गोळ्या येमेन येथील रुग्णालयात काढण्यात आल्या. परंतु चौथी गोळी काढण्यासाठी शरीराच्या पार्श्वभागावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. तिचे वय लहान असल्याने ही शस्त्रक्रिया अवघड होती. शिवाय शस्त्रक्रियेनंतर ती पुन्हा चालू शकेल का? हे आव्हान डॉक्टरांसमोर होते. परळ येथील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. आता तिच्यावर रुग्णालयात हिप करेक्शन शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्यात येणार आहेत. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर तिच्यावर फिजिओथेरपीने उपचार करण्यात येणार आहेत. ज्यामुळे तिला वॉकरच्या साहाय्याने चालता येऊ शकेल. काही वर्षांनी तिच्यावर आणखी शस्त्रक्रिया करण्यात येतील. यामुळे तिला या दुखापतीपासून कायमस्वरूपी दिलासा मिळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.