चतुर्थ प्रदक्षिणा...गणेश चतुर्थीची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 02:17 AM2019-09-02T02:17:06+5:302019-09-02T02:17:12+5:30

सन १८९० मध्ये गिरगावातील फडकेवाडीत गणपतीचे हे मंदिर उभारण्यात आले़

Fourth Prakrishna ... of Ganesh Chaturthi | चतुर्थ प्रदक्षिणा...गणेश चतुर्थीची

चतुर्थ प्रदक्षिणा...गणेश चतुर्थीची

Next

राज चिंचणकर 

मुंबई : मुंबापुरीत गणपतीची अनेक स्थाने आहेत. दक्षिण मुंबईपासून, मुंबईच्या उपनगरांपर्यंत विविध मंदिरांत अनेकविध रूपांत गणराय स्थानापन्न झालेले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईच्या काही प्रसिद्ध गणपतींसह, इतर मंदिरांतही गणेशभक्तांची बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लागते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यातील निवडक गणपतींच्या स्थानांना घातलेली ही चतुर्थ प्रदक्षिणा.
फडकेवाडी गणपती

सन १८९० मध्ये गिरगावातील फडकेवाडीत गणपतीचे हे मंदिर उभारण्यात आले़ येथील गणेशमूर्ती बडोद्याहून आणली गेली. आवास येथून गोविंद गंगाधर फडके हे गृहस्थ मुंबईला आले आणि त्यांनी गिरगावच्या व्ही. पी. रोडवरची जागा खरेदी केली. या जागेवर त्यांनी फडकेवाडी वसवली. त्यांना अपत्य नव्हते; त्यामुळे त्यांनी गणपती मंदिर बांधण्याचा निश्चय केला. दत्तकपुत्र श्री गजानन म्हणून हा गणपती ओळखला जाऊ लागला. थोड्याच कालावधीत या गणपतीची महती सर्वदूर पोहोचली आणि फडकेवाडीचा हा गणपती प्रसिद्ध झाला. अतिशय सुबक अशा या गणेशमूर्तीवरून नजर सहज हटत नाही.

श्री उद्यान गणेश
शिवाजी पार्क स्थित श्री उद्यान गणेश मंदिराची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली. त्यापूर्वी शिवाजी पार्कात काही जणांना वडाच्या पारावर एक गणेशमूर्ती दिसली. या ठिकाणी ही मूर्ती कुणी ठेवली, याबद्दल कुणाला काहीच माहीत नव्हते. पुढे या गणेशमूर्तीची पूजा सुरू झाली. कालांतराने तिथे मंदिर उभारण्यात आले. उद्यान गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची असून या मूर्तीच्या हातात गदा, दंत, शंख आणि लाडू आहे. शिवाजी पार्कात ही मूर्ती मिळाल्याने या गणपतीला श्री उद्यान गणेश असे नामाभिधान प्राप्त झाले.

वांच्छा सिद्धिविनायक गणेश
अंधेरी पूर्वेला असलेल्या वांच्छासिद्धी गणपती मंदिराची स्थापना सन १९२७ मध्ये करण्यात आली. या मंदिराच्या जागी आधी एक वाडी होती़ या वाडीत या गणपतीचे स्थान होते. मनात धरलेली इच्छा या गणपतीकडे प्रकट केल्यास ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने या गणपतीची वांच्छा सिद्धिविनायक गणेश म्हणून ओळख निर्माण झाली. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अंधेरी-कुर्ला मार्गावर हे मंदिर असून, या गणपतीची सुबक मूर्ती मन प्रसन्न करणारी आहे.

वझिरा नाक्याचा गणपती
वझिरा हे पूर्वी गावठाण होते. बोरीवलीच्या पूर्वेला असणाऱ्या या भागाचा विकास केला जात असताना येथील खडकाळ भाग सुरुंग लावून फोडला जायचा. त्यासाठी शेकडो कामगार येथे राबत होते. अशातच एक खडक फोडताना एका कामगाराला दृष्टांत झाला. परिणामी, इथले खडक फोडण्याचे काम थांबवण्यात आले. दुसºया दिवशी या खडकात गणेशमूर्तीचे दर्शन झाले. त्यामुळे हा गणपती स्वयंभू गणेश म्हणून ओळखला जाऊ लागला. गणपतीची मूर्ती असलेला हा खडक बराच मोठा असून, त्याचे स्वरूपच हत्तीच्या मुखासारखे आहे. वझिºयाच्या या गणपतीची प्रतिसिद्धिविनायक म्हणूनही ख्याती आहे.
 

Web Title: Fourth Prakrishna ... of Ganesh Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.