Join us

मुंबई-सिंधुदुर्ग हवाई प्रवासात कोल्ह्यांचा अडथळा; त्वरित उपाययोजना करा, वैमानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:09 PM

चिपी विमानतळ सुरू होऊन दोन महिनेही पूर्ण होत नाहीत, तोवर नवी समस्या उभी ठाकली आहे.

-सुहास शेलार

मुंबई: द्राक्षांवर ताव मारता येईना म्हणून तोंड आंबट करणाऱ्या कोल्ह्याची गोष्ट लहानपणी प्रत्येकाने ऐकली असेल. पण तंत्रज्ञानाप्रमाणे हल्लीचे कोल्हेही थोडे अपग्रेड झाले आहेत. त्यांनी चक्क हवाई मार्ग अडवण्यास सुरुवात केली असून, मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर सेवा देणाऱ्या वैमानिकांच्या नाकीनऊ आणले आहेत.

चिपी विमानतळ सुरू होऊन दोन महिनेही पूर्ण होत नाहीत, तोवर नवी समस्या उभी ठाकली आहे. २५ ते ३० सोनेरी कोल्ह्यांनी विमानतळ परिसरात वास्तव्य केले असून, ते सतत धावपट्टीवर येत असतात. त्यामुळे लँडिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळे येत आहेत. आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा असे प्रकार घडत असल्याची माहिती या मार्गावरील विमानात सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली. 

विमानतळावर तैनात असलेले कर्मचारी या कोल्ह्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात, पण काही वेळाने ते पुन्हा दृष्टीस पडतात. त्यामुळे लँडिंग वा टेक ऑफला उशीर होत असून, त्याचा परिणाम विमानसेवेवर होऊ लागल्याचेही या कर्मचाऱ्याने नमूद केले. त्यामुळे या कोल्ह्यांना विमानतळाबाहेर सुरक्षित अधिवासात सोडण्यात यावे, अशी मागणी वैमानिक आणि विमानतळ अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

चिपी विमानतळ २७५ एकरात पसरले आहे. चहुबाजूंनी उंच कुंपण बांधण्यात आले असले तरी हा दाट गवताळ प्रदेश असल्याने कोल्ह्यांनी तेथे वास्तव्य केले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची २ अंतर्गत सोनेरी कोल्हा (गोल्डन जॅकल्स) हा संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. तो सर्वभक्षक आहे.  फळे, पक्षी, कीटक, मासे आणि लहान सस्तन प्राणी खातो. या कोल्ह्याची शिकार आणि व्यापार हा दंडनीय  गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना इतर अधिवासात सोडताना विशेष परवानगीची गरज भासणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

सापळ्यांसाठी मागितली परवानगी-

सोनेरी कोल्हे हे प्रामुख्याने गवताळ प्रदेशात राहतात. त्यामुळे ते स्वतःहून येथून स्थलांतरित होतील, अशी शक्यता फारच कमी आहे. मानवाचा प्रतिकार परतवून लावण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे सापळे लावून त्यांना पकडण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ती मिळाल्यास त्यांना सापळ्यात पकडून अन्यत्र सुरक्षित अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :चिपी विमानतळविमानतळ