Join us

प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 5:27 PM

वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. यावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

आमच्याकडून वेदांता-फॉक्सकॉनसाठी सर्व ऑफर दिल्या होत्या. विरोधकांनी स्वत: आत्मपरिक्षण करावं. प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच राज्यात उद्योग वाढले पाहिजे. लोकांना रोजगार मिळायला हवे, तरुणांच्या हाताला काम मिळायला हवं, अशी आमची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मोठा प्रकल्प राज्यात येण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे मदत करणार आहे. मागच्या सरकारमध्ये मी होतो. मात्र निर्णय दुसरे घेत होते, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला. एकनाथ शिंदेंनी आज न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

तत्पूर्वी, माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटो मेसेज फिरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला?, याचं उत्तर मिळालं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते. त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

गुजरातनं फॉक्सकॉनला काय दिलं?, महाराष्ट्र इथे मागे पडला, नाहीतर ऑफर काही कमी नव्हती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

गुजरातची जमीन प्रकल्पासाठी अयोग्य- 

सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तळेगावची साईट योग्य असल्याचा उल्लेख वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालमध्ये नमूद करण्यात आला आहे. तर  गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य असल्याचाही उल्लेख या अहवालामध्ये आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाबाबत एक सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांनी जागेबाबत निरिक्षण करुन अहवाल सादर केला होता. त्यामध्ये सदर प्रकल्पाबाबत मत मांडलं होतं. 

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डीलएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरे