लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांकित फूडॲपमध्ये व्यवस्थापकीय संचालक असल्याचा दावा करत भाईंदरमधील व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी भामट्याला मालाड पोलिसांनी रविवारी अटक केली.
भाईंदर परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याला संबंधित फूडॲपची फ्रँचायझी घ्यायची होती.
त्यानुसार, त्यांनी विविध कंपन्यांचे संपर्क क्रमांक पुरविणाऱ्या एका डायरेक्टरीमधून एक मोबाइल क्रमांक मिळवला. जो अटक आरोपीचा होता. त्याला संपर्क केल्यावर त्याने स्वतःला या ॲपचा व्यवस्थापक म्हणवत रजिस्ट्रेशनच्या नावाखाली ९८ हजार रुपये लाटले. मात्र, त्यानंतर व्यावसायिकाला संपर्कच केला नाही. त्यानुसार, आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी मोबाइल क्रमांकावरून लोकेशन शोधले, जे वारंवार बदलत होते. अखेर नेरळ परिसरात तो असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तो मूळचा जामताडा जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्याकडून मोबाइल व सात हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.